गीता समजून घेताना - २ प्रबोधिनीचे काम करताना विविध सहकारी, वरिष्ठ आणि मित्रांशी अनेकानेक विषयांवर चर्चा होत असतात. एकांनी मला नुकतेच फेसबुकवरील एका ताईंचे लेखन पाठवले. त्यांच्या लेखनाबद्दल आदर वाटला. मुद्दे योग्य आहेत असेही वाटले. पण या ब्लॉगचा मूळ मुद्दा तो नाही, म्हणून लिंक कॉमेंटमध्ये ढकलत आहे. त्यांचा मुद्दा " अद्वैत तत्त्वज्ञानच अधिकाधिकांपर्यंत पोचते करणे महत्त्वाचे - कर्मकांडांनी नुकसान होते " अशा स्वरूपाचा आहे. मूळ मुद्दा गैर नाही. तो मान्य करूनही, मला त्याबद्दल काय वाटते आहे ते नोंदवत आहे. गीता समजून घेताना - या प्रवासाचाच तो भाग आहे. म्हणून आधीच्या लेखनाचा आधार घेऊन पुढे जात आहे. आधीचा लेख वाचला तरच हा लेख अधिक समजेल असे काही नाही. (गीतेवरील पहिला लेख) ब्लॉग जिथे लिहायला बसलोय, तिथे घरात समोर भिंतीवर एक अतिशय सुंदर परिच्छेद फळ्यावर लिहिलेला आहे. " सर्व प्रकारच्या परस्परविरोधी नि परस्परविसंगत वाटणाऱ्या पंथोपपंथांमध्ये हेच एक तत्त्व मुळाशी गोवलेले आहे की, सर्व सामर्थ्य, सर्व शुद्धता, सर्व वैभव हे आत्म्यामध्ये मूलत:च आहे. रामानुजाचार्यांच्या मताप्रमाणे हा आत्म...