Skip to main content

गीता समजून घेताना - २

गीता समजून घेताना - २ 


प्रबोधिनीचे काम करताना विविध सहकारी, वरिष्ठ आणि मित्रांशी अनेकानेक विषयांवर चर्चा होत असतात. एकांनी मला नुकतेच फेसबुकवरील एका ताईंचे लेखन पाठवले. त्यांच्या लेखनाबद्दल आदर वाटला. मुद्दे योग्य आहेत असेही वाटले. पण या ब्लॉगचा मूळ मुद्दा तो नाही, म्हणून लिंक कॉमेंटमध्ये ढकलत आहे. त्यांचा मुद्दा "अद्वैत तत्त्वज्ञानच अधिकाधिकांपर्यंत पोचते करणे महत्त्वाचे - कर्मकांडांनी नुकसान होते" अशा स्वरूपाचा आहे. मूळ मुद्दा गैर नाही. तो मान्य करूनही, मला त्याबद्दल काय वाटते आहे ते नोंदवत आहे. गीता समजून घेताना - या प्रवासाचाच तो भाग आहे. म्हणून आधीच्या लेखनाचा आधार घेऊन पुढे जात आहे. आधीचा लेख वाचला तरच हा लेख अधिक समजेल असे काही नाही. (गीतेवरील पहिला लेख) 

ब्लॉग जिथे लिहायला बसलोय, तिथे घरात समोर भिंतीवर एक अतिशय सुंदर परिच्छेद फळ्यावर लिहिलेला आहे. "सर्व प्रकारच्या परस्परविरोधी नि परस्परविसंगत वाटणाऱ्या पंथोपपंथांमध्ये हेच एक तत्त्व मुळाशी गोवलेले आहे की, सर्व सामर्थ्य, सर्व शुद्धता, सर्व वैभव हे आत्म्यामध्ये मूलत:च आहे. रामानुजाचार्यांच्या मताप्रमाणे हा आत्मा केव्हा केव्हा संकुचित होतो, तर केव्हा केव्हा प्रगल्भ होतो. आणि शंकराचार्यांच्या मताप्रमाणे केव्हा केव्हा तो केवळ झाकोळला जातो. पण या मतभेदांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. सर्व सुप्त वा असुप्त शक्ती आत्म्यामध्येच आहेत, यावर मात्र सर्वांचे एकमत आहे. यावर तुम्ही जेवढी श्रद्धा ठेवाल तितके उत्तम. सर्व शक्ती तुम्हांमध्येच आहे; तुम्ही काय हवे ते करू शकता; हा आत्मविश्वास असू द्या. आम्ही दुबळे आहोत, आम्ही अर्धवेडे आहोत, असे आजकाल कित्येक समजतात; तसे समजू नका. एखाद्याच्या मार्गदर्शनाविनासुद्धा तुम्ही जे मनात आणाल ते करू शकाल. कारण सर्व शक्ती त्या ठिकाणी आहे. उभे राहा आणि आपल्यातील ईश्वरत्व प्रकट करा. 

For if there is one common doctrine that runs through all our apparently fighting and contradictory sects, it is that all glory, power, and purity are within the soul already; only according to Ramanuja, the soul contracts and expands at times, and according to Shankara, it comes under a delusion. Never mind these differences. All admit the truth that the power is there -potential or manifest it is there — and the sooner you believe that, the better for you. All power is within you; you can do anything and everything. Believe in that, do not believe that you are weak; do not believe that you are half-crazy lunatics, as most of us do nowadays. You can do anything and everything without even the guidance of any one. All power is there. Stand up and express the divinity within you.

आम्हासमोरील कार्य (The Work Before Us) नावाच्या विवेकानंदांच्या "भारतीय व्याख्याने" या पुस्तकातील एका व्याख्यानाचा शेवट म्हणून वरील परिच्छेद येतो. त्या परिच्छेदाच्या आधीची वाक्य, मुद्दामहून वरील वाक्यांनंतर खाली देत आहे. 

We must, therefore, remember that our religion lays down distinctly and clearly that every one who wants salvation must pass through the stage of Rishihood — must become a Mantra-drashta, must see God. That is salvation; that is the law laid down by our scriptures. Then it becomes easy to look into the scripture with our own eyes, understand the meaning for ourselves, to analyse just what we want, and to understand the truth for ourselves. This is what has to be done. At the same time we must pay all reverence to the ancient sages for their work. They were great, these ancients, but we want to be greater. They did great work in the past, but we must do greater work than they. They had hundreds of Rishis in ancient India. We will have millions — we are going to have, and the sooner every one of you believes in this, the better for India and the better for the world. Whatever you believe, that you will be. If you believe yourselves to be sages, sages you will be tomorrow. There is nothing to obstruct you.

सारांशाने - ऋषी बनणे हेच आमचे धर्मदत्त कर्तव्य आहे. पूर्वीच्या सर्व ऋषींना वंदन - ते मोठेच होते! पण आम्ही आणखी मोठे बनू इच्छितो. पूर्वी भारतात शेकडो ऋषी होऊन गेले. आता लक्षावधी झाले पाहिजेत. तुमच्यातल्या प्रत्येकाने यावर जितकी लवकर श्रद्धा ठेवाल तितके भारताचे आणि जगाचे कल्याण होईल. तुम्ही स्वत: ऋषी आहात असा विश्वास ठेवलात, उद्याच ऋषी होणार आहात. कसलाही अडथळा त्यात येणार नाही.


कर्मकांडं, राजसिक भोग, तामसिक अज्ञान या सर्वच गोष्टी ऋषी बनण्यात अडथळा आहे. पण विवेकानंदांच्या वाक्यांची प्रतीती अधिक जोमाने येत नाही काय? सर्वसामान्य आत्मविश्वास आणि आत्मसन्मान हरवलेला माणूस आज आता भारतात असतो काय? असतो, पण जितक्या सहजपणे पूर्वी दिसायचा, किंवा त्याने पददलितच राहावे अशी जी योजना असायची ती आता आहे काय? प्रत्येकाला संधी, प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार, आणि भूक भारतात वाढत चालल्या आहेत, असे मला वाटते. नवीन माध्यमांमध्ये आमची संस्कृती, आमचे जीवन दाखवणे याबाबत पूर्वी आम्ही जितके चाचपडत असू, तितके आता आम्ही चाचपडत नाही. नवीन आत्मविश्वास घेऊन आम्ही जगासमोर जात असतो. चित्रपट, युद्ध, रोजचे तंत्रज्ञान, खेळ, संगीत, आमचे उद्योग, आमचे संशोधन अशा विविध क्षेत्रांमधील आमची कामगिरी गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात उंचावली जात आहे.

या सगळ्याचा संबंध उत्तमतेशी आहे. गीतेमध्ये विभूतियोगात उत्तमतेची साधना दाखवलेली आहे. पांडवांमध्ये धनंजय, गणणाऱ्यात मी काळ अशी "जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते (मी आहे)" असे विभूतियोगाचे वर्णन करता येईल. आत्मातील शक्ती सारख्या बाहेर काढत राहिल्या तर उत्तमताच प्रकट होणार नाही तर काय होणार? आणि हे करायला लावणे हे मूळ असेल, तर काही वेळा हे प्रकटीकरण जाणतेपणी होईल, तर काही वेळा अजाणतेपणी होईल. ज्ञानयोगात ते जाणतेपणी होत असते, भक्ती-कर्म योगांमधून ते निदान काही टप्प्यांपर्यंत अजाणता होते. होते हे महत्त्वाचे - जाणता-अजाणता हा भेद सुरुवातीला तरी महत्त्वाचा नाही. गोष्टी स्थिरावलेल्या - साचलेल्या नाहीत ना हे पाहणे महत्त्वाचे. साचलेल्या पाटातील तुंब काढणे हे सज्जनांच्या मना कळले पाहिजे हे तर समर्थांनी १६८१ साली संभाजीराजांना सांगितले. 


औपनिषदिक तत्त्वज्ञान हे जाणतेपणी - ज्ञानयोगाच्या साहाय्याने - ब्रह्मप्राप्तीचा मार्ग दाखवते. शुद्धता जर कर्मातून अथवा भक्तीतून प्रकट होऊ लागली तरीसुद्धा ती उत्तमतेकडे - म्हणजेच परमेश्वरी शक्तीच्या प्रकटीकरणाकडे घेऊन जाईल यावरही सोदाहरण चिकित्सक श्रद्धा ठेवायला हवी. 

नवविधा भक्ती उमलत कशी जाते हे समर्थांनी नऊ समासांमध्ये सांगितले. आत्मनिवेदनभक्ती ही दास्यभक्तीनंतर सांगितलेली आहे. त्यात सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता असेही टप्पे सांगितलेले आहेत. मला वाटते की वंदनादि भक्तीच्या आठ पायऱ्या एकूण समाजासाठी आता अपुऱ्या वाटत असतील तर आत्मनिवेदनभक्तीच्या शेवटाला आलेल्या चार मुक्तीच्या पायऱ्यांचा विस्तार करून तशा भक्तीच्या लाटा समाजात उचंबळवून आणणे हे आधुनिक संतांचे काम असणार आहे.

औपनिषदिक तत्त्वज्ञान हे एका व्यक्तीच्या विचारांसाठी आहे. ते समाजाच्या धारणेकरता वापरून घेताना सामाजिक आशय त्यात भरावा लागतो. ते गीतेला चांगले जमते. कर्मकांडात अडकून राहणे योग्य नाहीच, पण त्यांचे उन्नयन करण्याच्या व्यवस्था कमी पडत असतील, तर तो दोष त्या काळातील जाणत्यांचा आहे. शंकराचार्यांनी अद्वैताकडे सगळे जाणार नाहीत - पण ते एकमेकांमध्ये किमान भांडणार नाहीत अशी व्यवस्था पंचायतन पूजेतून करून दिली. रूपदर्शनाकडून गुणसंकीर्तनाकडे नेण्यासाठी उत्कृष्ट स्तोत्रे रचली. या उन्नयनाच्या व्यवस्था होत्या.

ज्यांना कर्मकांडे नकोत असे वाटते, त्यांनी उन्नयनाच्या व्यवस्था लावल्या पाहिजेत. कर्मकांडे नाकारण्याचे कारण नाही. मागच्या आठवड्यात मूळ गावी यात्रेला वीसेक वर्षांनी गेलो होतो. अजून अनेक कर्मकांडे शिल्लक आहेतच. मी तर्ककठोर नास्तिक असलो तरी सर्व उपचारांमध्ये मनापासून सहभागी झालो - कारण एकच - ते लोक माझे आहेत. बौद्धिकदृष्ट्या मी अन्यत्र कितीही समजून घेतले, तरी ज्या गावच्या यात्रेत लहानपणची ५-६ वर्षे काढली असतात तिथे जाणे वेगळेच ठरते हे या वीस वर्षांनंतर जाण्याने मला फार ठळकपणे दाखवून दिले. तिथल्या कीर्तनामध्ये अनेक गडबडीचे मुद्दे सांगितले जात असतील, पण तिथे पोचल्यानंतर आपलेपणाचा भाव हाच आम्हाला बांधणारा धागा होता. अद्वैत बांधत नाही. अद्वैत सांगते. कर्मकांडे आणि अन्य व्यवस्था बांधतात. त्या व्यवस्था उन्नत होणाऱ्या असतील हे पाहणे आपले काम असेल, तर नित्य त्या ठिकाणी जात राहिले पाहिजे असे मला मनोदेवतेने सांगितले. तो आदेश पाळायला हवा.

जसे एखादा अभ्यासक्रम रचून शिक्षण घडवता येते, तसे व्रतपालनाचे व जीवनोन्नयनाचे मार्ग सांगता आले पाहिजेत. त्यातले धोके, उतार, चढाव, उपवाटा, जवळची ठिकाणे, विश्रांतीच्या जागा, वेगाने सुसाट सुटण्याचे टप्पे असे सगळे सगळे मांडता आले पाहिजे. धर्मकारण हे व्यक्तीला समाजाशी, समाजांना समाजांशी, मानव्याला क्रूर विश्वाच्या जडत्वावर विजयी बनवण्यासाठी उपकारक ठरले पाहिजे. त्यासाठी जे जे उपयोगाचे आहे तेच वापरू असे न म्हणता, जी माणसे जिथे आहेत त्यांना उन्नयनाच्या मार्गावर स्वेच्छेने जात राहणारे कसे करून यासाठी ते जे काही वापरतात, त्या साधनांचे उन्नयन कसे करता येईल याचा विचार करू असे म्हणणे मला जास्त उपयोगाचे वाटते. 

अद्वैत तत्त्वज्ञान श्रेष्ठ असेल तर ते मॅट्रिक्स चित्रपटातही निर्देशित करता येणारच, इंटरस्टेलरमध्येही दाखवता येणारच, पिक्सारचे चित्रपटही या मार्गात मदत करणारच, भारतीय नवीन चित्रपट अधिकाधिक आधुनिक परिभाषा वापरून नवीन आशय नव्या सुसंगतीसह मांडणारच ही सगळी साधनांच्या उन्नयनाची कहाणी समजून घेणे उपयुक्त आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता, उद्योग व प्रचारांची नवी माध्यमे, तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक आविष्कार, आधुनिक मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र (आणि त्यांची प्रशिक्षण तंत्रे) यांची जोड व्रतपालनाला देता आली पाहिजे. त्या आधारे कर्मकांडांचेही उन्नयन सहजशक्य दिसते. 

समाजजीवनाशी जोडलेल्या व्रतपालनाद्वारे समाजोन्नती हा प्रयोग स्वातंत्र्यापूर्वी गांधीजींनी करून पाहिला. गांधींजींचा हा प्रयोग स्वातंत्र्य मिळाल्याने अर्धवट राहिला आहे. तो एक उत्कृष्ट प्रयोग रचलेला होता. तो ज्या कारणांनी अर्धवट राहिला, ती कारणे शोधून, ती कारणे दूर करून आपण आणखी मोठा प्रयोग केला पाहिजे. विनोबांनी जाणीवपूर्वक संघटना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला व प्रयोग पुढे नेता येतो का हे पाहिले. भूदानचे भव्य यश व सातत्यातील अपयश पाहून आपण शहाणे झाले पाहिजे. आर्यसमाज, रामकृष्ण संघ, इस्कॉन, स्वामिनारायण इ. संप्रदाय, विवेकानंद केंद्र, संघ इ. सामाजिक संघटना, इस्रोसारख्या तंत्रज्ञानाला वाहिलेल्या संघटना, अमूलसारख्या समाजजीवन संघटित करणारे उद्योग, वारकरी संप्रदाय व अन्यही धार्मिक संघटना यांच्या प्रयोगातील फलिते तपासून व्रतपालनाद्वारे उन्नयन या येत्या काळातील आवश्यक प्रयोगात आवश्यक ते बदल केले पाहिजेत. 

मुद्दा साधा आहे - अध्यात्माचे गेमिफिकेशन व्हायला हवे की नको? की अध्यात्म गेमिफिकेशनमध्ये गेले तर ते अध्यात्म राहणार नाही? तसे असेल तर ते अध्यात्मच नव्हे. व्यक्तीच्या आतला रजोगुण जागृत करून तिला भव्यतेचे उत्तमतेचे वेड लावणे आणि त्या वेडातून मिळणाऱ्या यशाचे अजीर्ण होऊ न देण्यासाठी नि:संगतेचे शिक्षण देऊन त्या रजोगुणाला सत्त्वगुणात उन्नयित करणे हे अध्यात्माने दिलेले ध्येय आहे असे मला वाटते. 

या कामी आधुनिक शिक्षणव्यवस्था, समाजजीवन, वैयक्तिक समुपदेशन, भविष्यवेत्तेपण, भारतीय अध्यात्म - हिंदू जीवनदृष्टी या सगळ्यांचा मिलाफ व्यक्तीला सहज व पचेल व करत राहण्याचा उत्साह वाढेल एवढ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे हा कळीचा प्रश्न आहे. त्यासाठी गीता कशी मार्गदर्शक ठरेल हे पाहात जायचे आहे.

(विशेष सूचना: हा ब्लॉग आज ८ एप्रिलरोजी लिहिलेला असला, तरी तो अजून सुधारत जाणार आहे. लेखनात उत्स्फूर्ततेमुळे अनेक ठिकाणी विस्कळीतपणा आहे. ब्लॉगमाध्यमाची सोय वापरून तो दुरुस्त करत राहीन. किती आवृत्त्या होत आहेत, ते इथेच नोंदवत राहिन.)

दहाव्या अध्यायातील उत्तमतेचा अर्थ लावण्यासाठी अजून काही विचार करून पाहणे भाग आहे, ते पुढच्या भागात पाहू.

Comments

Popular posts from this blog

गीता समजून घेताना - १

 गीता समजून घेताना - १ कालच्या गीताजयंतीच्या निमित्ताने आज लिहित आहे. गेले काही महिने काही जण गीतेचा अभ्यास करत आहोत. या अभ्यासाची सुरुवात गीतेच्या श्लोकांच्या विभागणीतून झाली. गीतेची १८ अध्यायांमध्ये विभागणी ही मूळ व्यासांनी केलेली विभागणी आहे असे मानू. ज्ञानेश्वर महाराज, शंकराचार्य यांनी प्रत्येक श्लोकावर भाष्य लिहिली. ती पद्धतच आहे. एकेक श्लोक घ्यायचा, त्यावर निरूपण लिहायचे. लोकमान्य टिळकांनीही गीतारहस्यात ही परंपरा सोडलेली नाही. त्यांनीही गीतेचा अर्थ लिहिता लिहिता आपले भाष्य त्यावर गद्य रूपात नोंदवले आणि त्या शिवाय १४-१५ प्रकरणांमध्ये तौलनिक तत्त्वज्ञान, प्रासंगिकता, नीतीशास्त्र अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे निबंधात्मक चिंतन मांडले. दोन्ही मिळून गीतारहस्य ग्रंथ तयार झाला.  १) क्रमाने विनोबांनी रसाळ भाषेत गीताप्रवचने लिहिली. त्यात श्लोकांच्या आधारे मांडणी नाही. संपूर्ण अध्यायावर एक छोटे प्रवचन असे स्वरूप देऊन त्या त्या अध्यायातील महत्त्वाच्या संकल्पनांचे सुबोध विवेचन असे गीताप्रवचनाचे स्वरूप राहिले. हे करताना विनोबांनी प्रत्येक अध्यायाचेही विषयांनुसार तुकडे पाडले. त्यांना अध...

धुरंधर -२ च्या निमित्ताने

SPOILER ALERT  कथानकातील काही घटनांचा थेट उल्लेख आहे, त्यामुळे आधी चित्रपट पाहून मग इथे आलेले चांगले.  धुरंधर -२ पाहिला.  अनेकांनी त्याच्या विविध पैलूंवरती पुष्कळ लिहिले आहे. बरे-वाईट दोन्ही लिहिले आहे. "पीक-डिटेलिंग" वर व्यंगचित्रेही बनवून झाली. सहसा वाचनात न आलेलं एक उदाहरण देऊन मुख्य मुद्द्याकडे जाऊ - एका अतिरेक्याला मारायला एक परिचारिका (नर्स) येते, तिची भूमिका यामी गौतम यांनी म्हणजे आदित्य धर यांच्या पत्नीने केलेली आहे. त्या परिचारिकेचे नाव शझिया बानो ठेवलेले आहे. तिच्या कपड्यांवरील नामपट्टीकडे सहज लक्ष जात नाही म्हणून ते लक्षात येत नाही. शझिया बानो हेच यामी गौतम यांच्या नुकत्याच आलेल्या "हक" या नितांत सुंदर चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेचे नाव आहे.  हा तपशील मांडण्याचे कारण धुरंधरच्या तत्त्वज्ञानाशी जोडलेले आहे असे वाटते. कसे ते हळू हळू पाहात जाऊ. धुरंधर -१ हे मुख्यत: वातावरण निर्मितीसाठीची तयारीच आहे. पाकिस्तानातील विविध गट, त्यांच्यातील लढाया, त्यांच्यातील ईर्ष्या / स्पर्धा, बलुच स्वातंत्र्यलढा याबद्दल पुरेशी पार्श्वभूमी तयार केली नसती तर भाग-२ मधील घटनांचा अ...

कॅथॉलिक चर्च या संघटनेचा अभ्यास

कल्पेशदादाने ज्ञान प्रबोधिनी, पुणे व्हॉट्सॅप गटावर पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली. माझी पण त्यांना श्रद्धांजली. जागतिक बंधुता आणि पर्यावरण या विषयांवर कट्टर, सनातनी वाटणाऱ्या चर्चचे प्रमुख म्हणून चांगले लेखन व कृती करणारे धार्मिक नेते म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. पोप फ्रान्सिस यांनी अनेक नवे बदल चर्चमध्ये घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आधीचे पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी प्रकृतीअस्वास्थ्यास्तव राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू होईपर्यंत एक वर्तमान पोप म्हणून फ्रान्सिस आणि पोप इमेरिटस बेनेडिक्ट हे दोघेही एकाच वेळी जिवंत होते.  या दोघांच्या संबंधावर एक छान चित्रपट आलेला होता. नेटफ्लिक्सवर आहे.जरूर पाहावा. या लेखाशी थोडाफार संबंधितही आहे. या चित्रपटाविषयी अजून जाणून घेण्यासाठी -  विकिपीडिया लिंक  .  आपण २००० वर्षं टिकेल अशी संघटना करायचं जेव्हा म्हणतो तेव्हा उदाहरण म्हणून चर्चचे उदाहरण समोर ठेवावेच लागेल. पोप फ्रान्सिस हे २६६ वे पोप आहेत. युरोप ग्रामावस्थेत असल्यापासून मध्ययुगपूर्व युरोपीय व्यवस्था, मध्ययुग, मध्ययुगात राज्यव्यवस्था आपल्या हातात ठेवणे, तिचा...