Skip to main content

गीता समजून घेताना - १

 गीता समजून घेताना - १

कालच्या गीताजयंतीच्या निमित्ताने आज लिहित आहे.

गेले काही महिने काही जण गीतेचा अभ्यास करत आहोत. या अभ्यासाची सुरुवात गीतेच्या श्लोकांच्या विभागणीतून झाली. गीतेची १८ अध्यायांमध्ये विभागणी ही मूळ व्यासांनी केलेली विभागणी आहे असे मानू. ज्ञानेश्वर महाराज, शंकराचार्य यांनी प्रत्येक श्लोकावर भाष्य लिहिली. ती पद्धतच आहे. एकेक श्लोक घ्यायचा, त्यावर निरूपण लिहायचे. लोकमान्य टिळकांनीही गीतारहस्यात ही परंपरा सोडलेली नाही. त्यांनीही गीतेचा अर्थ लिहिता लिहिता आपले भाष्य त्यावर गद्य रूपात नोंदवले आणि त्या शिवाय १४-१५ प्रकरणांमध्ये तौलनिक तत्त्वज्ञान, प्रासंगिकता, नीतीशास्त्र अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे निबंधात्मक चिंतन मांडले. दोन्ही मिळून गीतारहस्य ग्रंथ तयार झाला. 

१) क्रमाने विनोबांनी रसाळ भाषेत गीताप्रवचने लिहिली. त्यात श्लोकांच्या आधारे मांडणी नाही. संपूर्ण अध्यायावर एक छोटे प्रवचन असे स्वरूप देऊन त्या त्या अध्यायातील महत्त्वाच्या संकल्पनांचे सुबोध विवेचन असे गीताप्रवचनाचे स्वरूप राहिले. हे करताना विनोबांनी प्रत्येक अध्यायाचेही विषयांनुसार तुकडे पाडले. त्यांना अधिकरणे असे नाव आहे. १८ अध्यायांमध्ये मिळून अशी साठ अधिकरणे आहेत. त्या त्या अधिकरणांमधील श्लोकांनी एकेक ठळक विषय व्यक्त होतो. या अधिकरणांचा अभ्यास करण्याने गीतेचा अभ्यास जरा आवाक्यातला वाटू लागतो

२) गीतेचा अभ्यास करताना उपक्रम - संहार ही कसोटी लावून, कोणी मागाहून श्लोक घुसडले आहेत अथवा नाही ही चर्चा पूर्णपणे बाजूला ठेवून अर्जुनाला कर्तव्यमोह झाला, त्यावर कृष्णाने क्रमश: महत्त्वाच्या उपस्थित केलेल्या व संभाव्य अशा सर्व शंकांना उत्तरे दिली आणि नंतर अर्जुनाचा मोह दूर होऊन तो युद्धास तयार झाला, कर्म करत करत मोक्ष मिळव ही हिंदूंची सांगी गीतेतून स्पष्टपणे मांडली गेली असे ठळकपणे टिळकांनी मांडले आहे. त्यामुळे विविध अध्यायांमध्ये कुठे कुठे काय वर्णन विखुरले गेले आहे, एकेका सुट्या श्लोकाचा अर्थवाद करायचा की नाही यावर फारसा विचार न करता गीतेचे विहंगावलोकन करून अभ्यास करणे याचा एक उत्कृष्ट नमुना टिळकांनी "गीताध्यायसंगती" या गीतारहस्यातील चौदाव्या प्रकरणात दाखवला आहे. अमुक विवेचनानंतर विशिष्ट क्रमाने पुढचे विवेचन का आले, याची संगतवार मांडणी त्यांनी केली.

३) ही मांडणी, आणि अधिकरणे, आणि गीताप्रवचने याचा एकत्रित अभ्यास करताना काही गोष्टी लक्षात येतात. "अर्जुनाने काय करावे?" या ग्रंथारंभीच्या प्रश्नाचे उत्तर "त्याने कसे असावे" यातही दडलेले आहे. अर्जुनच नव्हे, तर त्या निमित्ताने मनुष्याने कसे असावे याचे वर्णन करणे म्हणजे आदर्श व्यक्तीचे वर्णन मांडणे हा भाग गीतेत पुन्हा पुन्हा आलेला आहे. अधिकरणांच्या भाषेत बोलायचे झाले तर नऊ अधिकरणांमध्ये मिळून १०१ श्लोकांमध्ये हे वर्णन आलेले आहे. स्थितप्रज्ञ, भक्त, गुणातीत अशा अनेक नावांनी हे वर्णन आलेले आहे. हे वर्णन वाचताना अनेक लक्षणे पुन्हा पुन्हा येतात हे लक्षात येतेच. त्यामुळे त्यांचा तौलनिक अभ्यास सुरू करावा असा विचार आला. गटातल्या सदस्यांनी प्रत्येक श्लोकातील लक्षणे वेगळी काढणे, ती वाचताना येणारे प्रश्न अथवा स्वत:चे भाष्य त्यावर नोंदवणे आणि श्लोकाचा एक-दोन वाक्यात अर्थ लिहिणे अशा कामाला सुरुवात केली. (गेल्या आठवड्यात ते काम पूर्ण झाले.) 



४) ही जी आदर्श व्यक्ती आहे, अशी व्यक्ती काम करत राहिली तर ती उत्तमतेकडे जाईल. उत्तमता हीच परमेश्वराची अभिव्यक्ती असे दहाव्या व अकराव्या अध्यायात मिळून सहा अधिकरणांमधील ९७ श्लोकांमधून सांगितलेले आहे. अशा व्यक्तींनी समाजामध्ये लोकसंग्रह घडवून आणावा / सृष्टियज्ञ चालवावा असे व्यक्तीच्या घडणीचे अंतिम उद्दिष्ट तिसऱ्या अध्यायातील दोन अधिकरणांमधील २१ श्लोकांमधून आलेले दिसते. 

५) या आदर्श व्यक्तींना समाजातील इतर व्यक्तींबरोबरच काम करायचे आहे. स्वभावांनुसार समाजातील व्यक्तींचे वैविध्य हे सहा अधिकरणांमधील ८५ श्लोकांमधून व्यक्त झालेले आहे. अनिर्बंध कर्मप्रेरणा असणारा रजोगुण आणि मागे खेचणारा, रचनांमधील जडत्व व्यक्त करणारा तमोगुण आणि दोन्हींचा तोल साधायचा प्रयत्न करणारा सत्वगुण हा भाग या सगळ्या वर्णनांमधून येतो.

६) व्यक्ती आदर्श व्यक्ती बनायची असेल तर तिने योगाचरण करावे ही गीतेची मुख्य सांगी आहे. ती पाच अधिकरणांमधील ५६ श्लोकांमधून व्यक्त झाली आहे. आपापल्या प्रेरणेनुसार कर्मयोग (चार अधिकरणे ४८ श्लोक), ज्ञान व ध्यानयोग (६ अधिकरणे ६७ श्लोक) अथवा भक्तियोगाने (पाच अधिकरणे, ४३ श्लोक) आचरत आचरत, योगाचरण करावे आणि आदर्श व्यक्ती बनावे असा क्रम गीतेने सांगितलेला आहे असे दिसते.

७) व्यक्तींचे स्वभाव वेगळे वेगळे का असतात आणि तरी सर्व व्यक्तींमधून अथवा सृष्टीतील सर्व पदार्थातून एकच तत्त्व व्यक्त कसे होत असते, याबद्दलचे विवेचन हेच हिंदूंचे मुख्य तत्त्वज्ञान आहे. या तत्त्वज्ञानाचा काही भाग शाश्वत तत्त्वज्ञान म्हणून गीतेत आलेला आहे. तो १७ श्लोकांमधून आलेला आहे (दोन अधिकरणे). तर काही भागातील श्लोकांचा अर्थ लावताना आधुनिक शास्त्रांचा उपयोग करून घेणे चांगले होईल असे वाटते. असे दहा अधिकरणांमध्ये मिळून ९४ श्लोक आलेले आहेत. हे ९४ श्लोक व कोण युद्धास उभे राहिले, कोणी कोणता शंख वाजवला, संजय आणि धृतराष्ट्राला काय वाटले असे त्या काळचे विषयप्रवेशाचे ७९ श्लोक असे मिळून १७३ श्लोक सध्या बाजूला ठेवले तरी चालतील असे वाटले. 

८) तत्त्वज्ञानातून सामाजिक परिस्थिती समजून घ्या, एकेका व्यक्तीने आपापल्या स्वभावानुसार व गरजेनुसार कर्म- ध्यान - ज्ञान अथवा भक्तिमार्गाने साधना सुरू करा, योगारूढ होऊन आदर्श व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा, प्रकृतीस्वभावानुसार समाजातील व्यक्तींचे वैविध्य समजून, त्यांच्याबरोबर काम करत करत उत्तमतेची साधना करत जा आणि मग त्यातून लोकसंग्रह व धर्मसंस्थापना (सृष्टितील यज्ञचक्र चालू राहणे) होईल असे पाहा असा गीतेचा एकूण अभिप्राय आहे, असे अधिकरणांचा एकत्रित अभ्यास करून त्यांचा ओघतक्ता मांडून पाहिल्यावर वाटते आहे.

९) गीतेच्या १८ व्या अध्यायातील पूर्ण साधना या अधिकरणातून (श्लोक ४१ ते ५६) यात हा क्रम फार चांगल्या प्रकारे व्यक्त झालेला दिसतो. पहिल्या चार श्लोकांमध्ये स्वभावज कर्मांचे दिग्दर्शन केलेले आहे. स्वभाव हा जन्मजात असेल वा घडवलेला असेल. पण स्वभावाला अनुसरून कामे अंगिकारली पाहिजेत, असा विचार आपण करायला हवा. व्यक्तीने आपापल्या कर्मांमध्ये मग्न राहावे त्यातच मोक्ष आहे. त्यातच परमेश्वराची पूजा आहे हा ही उपदेश थेटपणे (१८.४५-४६) आलेला आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्मकुसुमाचिया वीरा, पूजा केली होय अपारा, तोषालागी हे ज्ञानेश्वरीतील वचन गीतेतून थेट घेतलेले आहे (स्वकर्मणा तमभ्यर्च्य). अशी कर्मे करताना त्यात दोष येतीलही - कोणत्या कामात दोष नसतात? त्यामुळे मिळालेल्या वा मिळवलेल्या, निश्चित झालेल्या कामात स्थिर होऊन नैष्कर्म्य या स्थितीला व्यक्तीने पोचावे (१८. ४७-४९). हे पोचण्याचा मार्ग सांगताना गीतेने मोजून चार श्लोकांमध्ये व्यक्तिघडणीचा क्रम व्यक्त केलेला आहे. सात्त्विक बुद्धीला (प्रज्ञा) ही दृढ धृतीची जोड देऊन, विषयासक्तता सोडून, रागद्वेषादी भावनांवर विजय मिळवून, मन-वाणी आणि शरीर यांना कमीतकमी आहार देऊन, सतत ध्यानयुक्त राहून वैराग्यभाव वाढवत जावा. हे करताना बळ, दर्प, काम, क्रोध इ. सुटत जाईल आणि ब्रह्म म्हणजे काय ते समजेल. अशा माणसाना शोक वा इच्छा काहीच शिल्लक राहात नाही व ते समत्वबुद्धीने सर्वांशी वागतात (१८.५१ ते १८.५४). भक्ताला भक्तीने जो आध्यात्मिक लाभ मिळतो, तोच या समत्वबुद्धी असणाऱ्याला मिळतो असा समन्वय १८.५४ मध्ये दिसतो. त्यालाच शाश्वत पद / मोक्ष म्हटले आहे तेच गीतेने व्यक्तीसाठी सांगितलेले अंतिम ध्येय आहे. दुसऱ्या अध्यायात विषयांच्या ध्यासातून आत्मनाशाकडे जाणारा एक घसरणीचा क्रम सांगितलेला आहे, त्याच्या उलट क्रम या चार श्लोकांमधून दिसतो असे वाटते.

आदर्श व्यक्ती या १०१ श्लोकांमधील एका अधिकरणाबद्दल सविस्तर लिहिले. याच श्लोक-गटातील उर्वरित अधिकरणांबद्दल थोडक्यात नोंदवून मग "योगाने साध्य" या श्लोक-गटाबद्दल काही लिहिण्याचा मानस आहे.
क्रमश: वरील ओघतक्त्यातील बहुतेक सर्व श्लोकगटांबद्दल काही ना काही लिहावे असा संकल्प आहे. 

Comments

Popular posts from this blog

कॅथॉलिक चर्च या संघटनेचा अभ्यास

कल्पेशदादाने ज्ञान प्रबोधिनी, पुणे व्हॉट्सॅप गटावर पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली. माझी पण त्यांना श्रद्धांजली. जागतिक बंधुता आणि पर्यावरण या विषयांवर कट्टर, सनातनी वाटणाऱ्या चर्चचे प्रमुख म्हणून चांगले लेखन व कृती करणारे धार्मिक नेते म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. पोप फ्रान्सिस यांनी अनेक नवे बदल चर्चमध्ये घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आधीचे पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी प्रकृतीअस्वास्थ्यास्तव राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू होईपर्यंत एक वर्तमान पोप म्हणून फ्रान्सिस आणि पोप इमेरिटस बेनेडिक्ट हे दोघेही एकाच वेळी जिवंत होते.  या दोघांच्या संबंधावर एक छान चित्रपट आलेला होता. नेटफ्लिक्सवर आहे.जरूर पाहावा. या लेखाशी थोडाफार संबंधितही आहे. या चित्रपटाविषयी अजून जाणून घेण्यासाठी -  विकिपीडिया लिंक  .  आपण २००० वर्षं टिकेल अशी संघटना करायचं जेव्हा म्हणतो तेव्हा उदाहरण म्हणून चर्चचे उदाहरण समोर ठेवावेच लागेल. पोप फ्रान्सिस हे २६६ वे पोप आहेत. युरोप ग्रामावस्थेत असल्यापासून मध्ययुगपूर्व युरोपीय व्यवस्था, मध्ययुग, मध्ययुगात राज्यव्यवस्था आपल्या हातात ठेवणे, तिचा...

... यांची तेजस्वी परंपरा म्हणजे मी! - पूरक मुद्दे

 वरील शीर्षक असणाराच लेख पूर्वी पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांनी "भारताचा राष्ट्रवाद" या संग्रहात मांडलेला आहे. मनुष्याला सुटे अस्तित्व नसून, तो अनेक परंपरांचा परिणाम असतो. असे या लेखात अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शविले आहे. मला अनेक परंपरांचा परिणाम म्हटला की मॅट्रिक्स सिनेमा आठवतो. त्यात, मॅट्रिक्सचा आरेखक (the Architect) कथानायकाला असे सांगतो की तुझे त्याच्याकडे - आरेखकाकडे जाणे - हे अनेक घटनांच्या बेरजेचा परिणाम आहे. अशा परंपरांकडे तुच्छतेने वा द्वेषाने बघण्याची दृष्टी मार्क्स वा त्याच्या सारख्या जगभराच्या अर्धवट विचारवंतांकडेच, किंवा छद्म-उदारमतवादी लोकांकडे असू शकते. परंपरांनी "नाही रे" वर्गाचे शोषण करणे शक्य होते, हे वादापुरते मानू. परंपरा सतत सुधारत्या राहिल्या आहेत, व परंपरांची बेरीजच अस्तित्वाचे सातत्य टिकवून धरते, हे मार्क्सिस्टांना  अथवा त्यांच्या भारतातील ०.००५% संपृक्त भ्रष्ट नकलांना कधी कळलेच नाही असे मला स्पष्टपणे वाटते.  पुगंच्या लेखात परंपरा, त्यांचे औचित्य, कालानुरूप बदल करणे इ. अनेक मुद्द्यांचा सविस्तर ऊहापोह केलेला आहे. त्यासाठी हा लेख नाहीच. पु...