कल्पेशदादाने ज्ञान प्रबोधिनी, पुणे व्हॉट्सॅप गटावर पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली. माझी पण त्यांना श्रद्धांजली. जागतिक बंधुता आणि पर्यावरण या विषयांवर कट्टर, सनातनी वाटणाऱ्या चर्चचे प्रमुख म्हणून चांगले लेखन व कृती करणारे धार्मिक नेते म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो.
पोप फ्रान्सिस यांनी अनेक नवे बदल चर्चमध्ये घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आधीचे पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी प्रकृतीअस्वास्थ्यास्तव राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू होईपर्यंत एक वर्तमान पोप म्हणून फ्रान्सिस आणि पोप इमेरिटस बेनेडिक्ट हे दोघेही एकाच वेळी जिवंत होते.
आपण २००० वर्षं टिकेल अशी संघटना करायचं जेव्हा म्हणतो तेव्हा उदाहरण म्हणून चर्चचे उदाहरण समोर ठेवावेच लागेल. पोप फ्रान्सिस हे २६६ वे पोप आहेत. युरोप ग्रामावस्थेत असल्यापासून मध्ययुगपूर्व युरोपीय व्यवस्था, मध्ययुग, मध्ययुगात राज्यव्यवस्था आपल्या हातात ठेवणे, तिचा आपल्या स्वत:च्या कर्मठतेमुळे ऱ्हास होताना बघणं, मध्ययुगोत्तर काळात आपल्या विरुद्ध नवी क्रांतिकारक धार्मिक संघटना उभी होताना बघणं, विज्ञानाच्या प्रगतीसमोर आधिभौतिक व आधिदैविक क्षेत्रांमधील स्वत:ची गरज कमी होताना बघणे, साम्राज्यशाही वाढताना पाहणे, दोन महायुद्धांच्या परिणामस्वरूप ती घसरताना पाहणे, इतर संस्कृतींचेही पुनरुज्जीवन होताना, त्या अधिक राष्ट्रवादी होत जाताना, व त्यामुळे आपला प्रभाव कमी होत जातोय हे वास्तव स्वीकारून, एका प्रमाणात पुन्हा तो प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी नैतिक व अनैतिक सर्व मार्ग वापरणे अशा विविध पैलूंचा व काळांचा परिणाम झालेली व विविध काळांवर परिणाम घडवलेली अशी ही संघटना आहे. या संघटनेत कालांतराने हिंदू मूल्ये अपरिहार्यपणे घुसत जातीलच. देव, देवपुत्र येशू, आणि देवदूत / पवित्र आत्मा (Holy Ghost) या त्रिमूर्तीतील व्यावहारिक द्वैत हा एका श्रेष्ठ अद्वैताचा कसा भाग आहे हे आपल्याला पुढच्या ५०-६० वर्षातला एखादा पोप सांगेलच.
२०२१ च्या गुढीपाडव्याच्या व्याख्यानात या चर्चचा युरोपीय सामाजिक व्यवस्था घडवण्यात कसा परिणाम झाला आहे, याचे एका शोधनिबंधाच्या आधारे झालेल्या विवेचनाचा मी परिचय करून दिलेला होता. अशा प्रकारचा चर्चचा अभ्यास सतत आपण करत राहायला पाहिजे.
चर्चला अनेक प्रकारची काळी बाजू आहेच. तरी ते अस्तित्वात राहिले आहे. ते सहजासहजी गायब होणार नाही. त्यामुळे चर्चने हे सगळे जगातले उद्योग करताना लावलेल्या व्यवस्था, बारीकसारीक तपशील, केलेले करार-मदार, खेळलेली राजकारणे या सगळ्याचा आपण अभ्यास केला, तर जगाच्या घडणीत बरा-वाईट सर्व प्रकारचा परिणाम असलेली संघटना समजेल. अन्तर्गत बंधुता, प्रशिक्षण योजना, कार्यकर्ता घडण, नेतृत्वशैली, समाजाभिमुखता अशा अनेक गुणांसाठी आपण चर्चचा अधिक अभ्यास केला पाहिजे. वर सांगितलेल्या चित्रपटात अशी समाजाभिमुख, द्वंद्वाभिमुख संघटना चांगल्या प्रकारे दिसून येते. असे ताण, असे संघर्ष मागे मागे पाहात गेल्यास जागतिक पट समोर येईल.
येणाऱ्या काळात भारतापुरते अस्तित्व असणाऱ्या सर्वच प्रकारच्या संघटनांना वरील मुद्द्यांचा सूत्रबद्ध अभ्यास करावा लागेल.
पुढील पंधरा-वीस दिवसांमध्ये नवीन पोप निवडला जाईल. त्या सगळ्या प्रक्रिया टीव्हीवर दिसतील. युट्यूबवर पटकन दिसतील. आवर्जून पाहाव्यात. त्यानिमित्ताने होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी, संस्कार कार्यक्रम यांची दखल घेऊ या. आपले त्यावरचे मत तयार करू यात.
कुंभमेळा आकाराने, सातत्याने, इतिहासानेही चर्चपेक्षा मोठा आहे. जागतिक इतिहासावरील प्रभावाच्या दृष्टीने तो अजून लहान आहे. त्यात सध्या नव्याने वाढू लागलेली, संघटनवृत्ती अधिक चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी चर्चकडूनही काही गोष्टी आपणा हिंदूंना शिकाव्या लागतील. "कृण्वन्तो विश्वमार्यम् "साठी ते अत्यावश्यक आहे.
Comments
Post a Comment