वरील शीर्षक असणाराच लेख पूर्वी पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांनी "भारताचा राष्ट्रवाद" या संग्रहात मांडलेला आहे. मनुष्याला सुटे अस्तित्व नसून, तो अनेक परंपरांचा परिणाम असतो. असे या लेखात अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शविले आहे.
मला अनेक परंपरांचा परिणाम म्हटला की मॅट्रिक्स सिनेमा आठवतो. त्यात, मॅट्रिक्सचा आरेखक (the Architect) कथानायकाला असे सांगतो की तुझे त्याच्याकडे - आरेखकाकडे जाणे - हे अनेक घटनांच्या बेरजेचा परिणाम आहे. अशा परंपरांकडे तुच्छतेने वा द्वेषाने बघण्याची दृष्टी मार्क्स वा त्याच्या सारख्या जगभराच्या अर्धवट विचारवंतांकडेच, किंवा छद्म-उदारमतवादी लोकांकडे असू शकते. परंपरांनी "नाही रे" वर्गाचे शोषण करणे शक्य होते, हे वादापुरते मानू. परंपरा सतत सुधारत्या राहिल्या आहेत, व परंपरांची बेरीजच अस्तित्वाचे सातत्य टिकवून धरते, हे मार्क्सिस्टांना अथवा त्यांच्या भारतातील ०.००५% संपृक्त भ्रष्ट नकलांना कधी कळलेच नाही असे मला स्पष्टपणे वाटते.
पुगंच्या लेखात परंपरा, त्यांचे औचित्य, कालानुरूप बदल करणे इ. अनेक मुद्द्यांचा सविस्तर ऊहापोह केलेला आहे. त्यासाठी हा लेख नाहीच. पुगंचा लेख ज्यांना समजू / पचू शकतो, त्यांनीच पुढील विवेचन वाचावे.
कै. आप्पांनी सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बरीच भर घातलेली आहे. येथील परंपराविध्वंसक अहिंदू लोकांची पूज्यस्थाने भारतातच असू शकतात (पुण्यभूची कसोटी), हा सावरकरांच्या व्याख्येतील एक दोष आप्पांनी समाजप्रामाण्य या मुद्द्याची भर घालून दूर केलाच आहे, त्याशिवाय स्वत: मानसशास्त्रज्ञ असल्याने काही वर्तनलक्षणे व ध्येयलक्षणेही या व्याख्येत दिली आहेत.
उपास्याविषयी अनाग्रह, उपासना-साधनांविषयी स्वीकारशीलता, बाह्यसृष्टीवर विजयाची तीव्र इच्छा (ही कमी झाल्यामुळेच आपण पारतंत्र्यात सापडलो; व राजकीय - सामाजिक - आर्थिक स्वातंत्र्य मिळालेले असले, तरी अजून वैचारिक स्वातंत्र्य मिळवायचे आहे!!) यांच्यासोबत अध्यात्मप्रवण मन ही देखील हिंदुपणाची लक्षणे आहेत असे त्यांनी मांडले आहे. या चार मुद्द्यांच्या आधी हिंदुत्वाचे अत्यावश्यक लक्षण म्हणून एका तेजस्वी परंपरेला "आपली" मानणारा समाज हा महत्त्वाचा. समाज हा कारण, व संस्कृती, धर्म आणि राष्ट्र ही या कारणाची कार्ये. अशी मांडणी कै. आप्पांनी केलेली आहे. अशा परंपरेचा पाईक असणाऱ्या समाजाला प्रमाण मानणारा तो हिंदू असे लक्षण आप्पांनी नोंदवलेले आहे. जसे समाजप्रामाण्य म्हणजे काय हे मांडलेले आहे तसेच एखादी व्यक्ती समाजप्रामाण्यवादी आहे अथवा नाही, हे तपासण्याची युक्तीही दिलेली आहे. ज्या व्यक्तीला समाजावर झालेले आक्रमण स्वत:वरचे आक्रमण वाटते, समाजाचे यश हे स्वत:चे यश वाटते, त्या व्यक्तीबद्दल ती समाजप्रामाण्य मानणारी आहे असे म्हणता येऊ शकते.
या वाक्याचा अनुभव मी गेले अनेक वर्ष घेत आहे. कोणी भारताला, महाकुंभाला किंवा अन्य कोणत्याही गोष्टीला, माझ्या कार्यसंघाला, माझ्या मातृसंघटनेला शिव्या घातल्या तर माझा अहंकार प्रचंड दुखावतो. एखाद्या व्यक्तीने मला बुद्धी कमी आहे, समज कमी आहे, माझे हेतू वाईट आहेत असे काहीही म्हणावे. मला फरक पडत नाही. मी ते स्वत:ला लावून घेतही नाही. पण फुकटची टीका समूहावर व परंपरेवर झाली की मी भयंकर अस्वस्थ होतो. मला माझे पूर्वज दोषी होते म्हटले तर कमी राग येतो. माझ्या जातीच्या लोकांनी अन्यांवर अन्याय केलेले आहेत हे ही पचते. पण हिंदू धर्म दोषी असे म्हणालात तर माझ्या नजरेत तुम्ही माझे सात जन्माचे गुन्हेगार होता. वैयक्तिक टीकेला मी तितके उत्तर देत नाही, जितके मी समाजावरील टीकेला उत्तर देतो. अशा वेळी सर्व सभ्यतेच्या मर्यादा सोडून समोरच्याला सोलून काढण्याची तीव्र भावना मनात येते. मातृसंस्थेच्या एका विभागाने दुसऱ्या विभागातील कार्यपद्धतीवर टीका केली तरी हा माझा अवयव जागृत होतो.
या उलट छद्मपुरोगामी, छद्म-उदारमतवादी लोकांना वैयक्तिक दूषणे अधिक अपमानास्पद वाटतात. हे सर्वसाधारण निरीक्षण आहे. व्यक्तीचा अपमान का केला हा त्यांच्यासाठी जागतिक नव्हे विश्वात्मक प्रश्न होऊन बसतो. ते राष्ट्र-बिष्ट्र मानत नसल्याने त्यांना व्यक्तिगत अपमान म्हणजे विश्वप्रलय वाटतो. मग ते भैसाटतात व समोरच्यावरती थेट आक्रमण करतात.
मला व्यक्तिगत अपमानाचे पडलेले नसल्याने, अशा वेळी समोरचा एवढा का बिघडला हे पूर्वी समजायचे नाही. आता ते समजते. व्यक्तीने स्वत:च्या अपमानाचा एवढा बाऊ करणे योग्य नाही असेच माझे मत आहे. आपण समाजात राहात असताना परंपरा, नियम इ. अनेक मुद्द्यांच्या चौकटीतच व्यक्ती बघायची असते असे मी मानतो. त्यामुळे व्यक्तीने जर समाजाचा अपमान केला, विनाकारण दूषणे दिली, तर त्या व्यक्तीला त्याची स्पष्ट जाणीव करून दिलीच पाहिजे असे मला वाटते. आणि ती व्यक्ती समाजाला ज्या तीव्रतेने दोष देत असते, तेवढ्याच तीव्रतेने मी त्या व्यक्तीला दोष देतो. हे माझे वागणे समाजप्रामाण्याची अभिव्यक्ती आहे असे मला वाटते.
या छद्म-पुरोगाम्यांनी उत्क्रांती व सर्वसाधारण जीवशास्त्र इ. चा इतर अनेक मुद्द्यांप्रमाणेच अर्धवट अभ्यास केलेला असतो. त्यामुळे त्यांना पुनरुत्पादन, गुण-वारंवारिता (allele-frequency) इ. मुद्द्यांनी उत्क्रांतीचा - मग ती जैविक असो वा सांस्कृतिक - कसा अभ्यास करायचा असतो हे समजणे अशक्य आहे. परंपरा, natural selection, neutral selection व allele-frequency इ. मुद्द्यांचा विचार केला तर मग टाकाऊ गोष्टी कशा निघून जातात, नवीन कशा स्वीकारता येतात या मागील कार्यकारणभाव अधिक नेमकेपणाने समजू शकतो. आणि मग समाजघडणीचे गतिशास्त्र (dynamics) मांडणे सोपे जाऊ शकते.
अशा समाजप्रामाण्याकडे दोष म्हणून पाहायचे की गुण म्हणून पाहायचे, हे बराच काळ मी ठरवत नव्हतो. आता मला तो गुणच वाटू लागला आहे. पूर्वी आपण दुसऱ्या कोणावर टीका केली की मला काही काळाने वाईट वाटे. आपण आपल्या रागावर नियंत्रण मिळवले पाहिजे असे वाटे. समाजावर टीका झाली / समाजाला अभिमानास्पद वाटले की जेव्हा लोक एकत्र येतात, तेव्हा ही विघ्नसंतोषी मंडळी "बघा बघा मी कसा वेगळा" एवढ्याच भावनेने "दुसरी" बाजू मांडायला धावतात. हे अनेक वेळा पाहून, "व्यक्तिगत टीका नको, असभ्य / असंसदीय भाषेत टीका नको" हा ही यांच्या टिनपाट कार्यपद्धतीचाच भाग आहे असे आता मला वाटते. कारण पाडगावकराने "डाव्या गांडीवर हात ठेवून सलाम" वगैरे लिहिले की यांचे क्रांतीचे अवयव उद्दीपित होतात.
विद्रोह हा विशिष्ट वर्गानेच केला तर प्रमाण ही यातली ग्यानबाची मेख. हा शुद्ध भंपकपणा आहे. आणि या मेणचट छद्म-उदारमतवाद्यांची भंपकपणावर विशेष मक्तेदारी आहे. तुम्ही समाजावर परंपरा-उच्छेदी आणि विनाकारण टीका केलीत, तर मी व्यक्तिगत टीका करणे हे आता मला माझ्या नवीन कार्यपद्धतीचे अविभाज्य अंग वाटते आहे. तुम्ही समाजाच्या गुण-दोषांची वाह्यात विखारी चर्चा केलीत, की मी व्यक्तिगत संस्कार, त्यामागील कार्यकारणभाव काढला पाहिजे असे वाटते.
व्यक्तिश: माझ्यासारखीच भावना असणारेही अनेक जण आहेत हे ही माझ्या लक्षात येत गेले. त्यांनाही व्यक्तिगत मानपमानाचे फारसे पडलेले नसते. पण समाजाला विनाकारण नावे ठेवली की ते ही अस्वस्थ होतात. अशांचे आणि माझे टिपण जुळते, असे लक्षात आल्यावर मी अधिक आश्वस्त झालो.
वरील प्रतिपादनातील "विनाकारण, विखारी" अशा शब्दांच्याही कार्यात्मक व्याख्या दिल्या पाहिजेत. समतोल, मर्यादांची व इतिहासाची जाण ठेवून लिहिलेली टीका अनाठायी नाही. मग ती समाजावरची टीका असली तरी अनाठायी नाही.
उदा. साने गुरुजीसारख्या भोटम माणसावर मी अनेकदा सडकून एकेरी टीका केली आहे. पण त्यांनी पुरुषांनीही स्त्री-गुणांची जोपासना केली पाहिजे असे शामच्या आईमध्ये लिहिलेले मला मान्य आहे. याच सान्यानी मात्र अनेकदा हिंदुत्ववाद्यांवर विनाकारण टीका केली आहे, मग तो माझ्याकडून अनादरासच पात्र होतो. साने गुरुजी या इसमाबद्दल तसे ते मी अनेकदा सांगतो - आदराची व अनादराची स्थाने - दोन्ही सांगतो. तरच मी falsifiability / खोडताळा अशा पद्धतीने शास्त्रीय टीका करतोय असा अर्थ होतो. मात्र हल्लीची अनेक जातीयवादी कुत्री सामान्यीकरण करून टांगा वर करतात, तर मग त्यांची जडणघडण काढावीच लागणार असे माझे प्रतिपादन आहे.
विविध विचारसरणींमध्ये पूल बांधावेत, समन्वय साधावा असे आणखी एक प्रतिपादन असते. मरू घातलेल्या / खचू घातलेल्या विचारसरणीबरोबर पूल बांधावेत, हे मला अजिबात मान्य नाही. पूल बांधायचेच तर खरोखर विश्ववादी / कर्तृत्ववादी लोकांशी राष्ट्रवादी विचारसरणीच्या लोकांमध्ये बांधले जावेत. छद्म-पुरोगामी व छद्म-उदारमतवादी लोकं ही सांस्कृतिक अंगाने मृतवत आहेत. त्यांच्यावर अधिक ऊर्जा खर्च करू नये.
यामुळे, समाजप्रामाण्य, राष्ट्रवाद या गोष्टी मला नवीन युवकांना त्यांच्या घडणीचा भाग म्हणून सांगायच्या आहेत. ते सांगताना परमतसहिष्णुता, सर्वमतप्रश्नास्पदता आणि स्वमतपरिवर्तनीयता ही हिंदूंची वैशिष्ट्ये आधुनिक युवकासाठी आवश्यक मूल्ये आहेत हे ही सांगायचे आहे. ही मूल्ये नसलेले मार्क्स-इस्लामादि पंथ टाकाऊ आहेत, हे ही स्पष्टपणे सांगायचे आहे. यांना संपवण्यासाठी नाही, तर जग पुढे नेण्यासाठी हिंदुत्वप्रणीत गुण अनेकांमध्ये असले पाहिजेत, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. सतत कर्मे करून, लोकसंग्रह करून, नव्या-जुन्याचा समन्वय साधीत, राष्ट्रकेंद्रित विज्ञाननिष्ठ कर्मयोग आचरून, व अशा आचरणासाठी अत्यावश्यक कर्तव्यप्रधान व त्यागप्रधान भूमिका घेऊन "कृण्वन्तो विश्वमार्यम्" हेच आपल्याला नवयुवकांना सांगायचे आहे. बाकीची मांडणी हे प्रासंगिक अपघात होते, ते समजून घेऊन, ते टाळायचे आहेत, असे नवयुवकांना सांगायचे आहे.
Comments
Post a Comment