Skip to main content

शिवचरित्र आणि प्रेरणा

 शिवचरित्र हा माझ्या साऱ्या अस्तित्वाचा सर्वात आतला कठीण - न तुटणारा - गाभा आहे. मी पाचवीत असतानाच आमच्या घरी जुनं राजा शिवछत्रपती मिळालं. दोन दिवसांमध्ये दोन्ही खंड वाचून झाले. कुठेही मार्ग कुंठले, अस्वस्थता आली की शिवचरित्र काढून वाचत बसावे. एकदा २०२४ च्या लोकसभेच्या निकालांनंतर असाच नाशिकवरून पुण्याला येत होतो. मनात अस्वस्थताच होती. एकगठ्ठा मतदान करून विकासाची बाजू धर्मापेक्षा कमी महत्त्वाची मानणे असा जुनाच धडा मुसलमानांनी त्या लोकसभेत पुन्हा मालेगावसारख्या दोन-तीन ठिकाणी घालून दाखवलेला होता, हे निकालांच्या विश्लेषणानंतर पुरेसं स्पष्ट होतं. अभावितपणे मी गाडी चालवता चालवता काही तरी ऐकायचे म्हणून निनाद बेडेकरांची सलग व्याख्यानं लावली. सलग प्रवासात ३-४ व्याख्यानं ऐकून झाल्यावर मला खूपच आधार मिळाला. छत्रपतींना तर याहून भीषण इस्लामी धर्मांधतेच्या अंध:काराला मागे रेटावं लागलं होतं. आपण अनेक लढाया नंतर जिंकत आलेलो आहोत. अजूनही जिंकण्याच्या स्थितीत जाणार आहोत, हा शिवचरित्रानेच प्रेरणा देण्याचा लख्ख प्रसंग मला आठवतोय.

असंख्य ठिकाणी शिवचरित्रातली वाक्ये व प्रसंग उद्धृत करून निर्णय दिलेले मला आठवत आहेत. गेली अनेक वर्षं शरद पवार विरचित संभाजी ब्रिगेड प्रणीत जातीयवाद महाराष्ट्रात फोफावतोय. यांनी "रं**ज रामदास" अशा नावाच्या पुस्तकांचा हैदोस घातला होता. अजूनही कालवलेलं विष सगळीकडे दिसतंय. त्याने आमचे अनेक हिंदुत्वनिष्ठ मित्र अस्वस्थ झालेलेही पाहिले. पण सर्व मावळांमधल्या सर्व नद्यांमधून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. एकदा नाशिकमधल्या माझ्या मित्रांनी जातीय वातावरणाबद्दलची अस्वस्थता व्यक्त केली. मी एकच प्रश्न विचारला - "तुम्हाला नामदेवराव जाधव हे नाव माहितीय का?". मित्र म्हणाले "नाही." परत विचारलं - "बाबासाहेब पुरंदरेंचं नाव माहितीय का?" मित्र म्हणाले "हो". म्हटलं हा फरक आहे. नितीन देसाईंनी जेव्हा "राजा शिवछत्रपती" मालिका काढली, तेव्हा नामदेवराव जाधव मॅनेजमेंट गुरू व्हायचे होते. तेव्हा ते इतिहासकार म्हणून म्हणवले जात होते. बाबासाहेबांच्या बरोबरीने या बाबाचे नाव सल्लागार म्हणून मालिकेच्या शीर्षकांंमध्ये दिसायचे. आता नामदेवरावाची अवहेलना त्याचेच समर्थक जाता येता करताना सहज दिसून येतात. त्याच मालिकेतला अमोलदादा कोल्हे अनेक उड्या मारून जरी पवारांच्या वळचणीला बसलेला असला, तरी निवळलेला दिसतो. खुद्द पवारसाहेब पेशव्यांनी दिलेल्या राज्यसभेत सुखात जाऊ घातलेत. त्यांनी ताकद दिलेले छत्रपती सर्व राजकीय ताकद आवरून बसलेले आहेत. हे सर्व सांगून म्हणालो, ज्यांच्याकडे स्वत्व नाही, त्यांचे असेच पराभव भविष्यात लिहिलेले आहेत. 

 शिवचरित्र हेच या राष्ट्राचे स्वत्व जागृत ठेवण्याची जागा आहे. स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराज्य हा मंत्र महाराजांनी आम्हाला दिला आहे. भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान रायगडावर छत्रपतींचे ऋण फेडायला दोन वेळा येऊन गेले. महाराजांची इच्छा पूर्ण झाली असेच मानावे लागेल. तीर्थस्थळे मुक्तच झाली असे नाही, तर ती आधुनिकही होऊ लागली. आमच्याकडे डोळे वटारून बघणाऱ्यांना माना खाली घालण्याची वेळ आली. ही जनतेच्या स्वत्वाची अभिव्यक्ती मुक्तपणे होऊ लागल्यावर औरंग्याही बुडाला हा इतिहास स्मरल्यामुळे आज राष्ट्र उन्नत होत जात आहे. ती अभिव्यक्ती आर्थिक, भाषिक, सामाजिक, वैज्ञानिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला करत राहायची आहे - संघटित सामर्थ्यावरती निरनिराळे पराक्रम करायचे आहेत ही ती शिवचरित्राची प्रेरणा!

या प्रेरणेवर पुष्कळ लिहिण्याजोगे आहे. पण शिवचरित्राचा अभ्यास सर्वांचाच सतत वाढता असावा या साठी प्रयत्न करावे लागतात हे सारखे जाणवते. गेले काही वर्षं मी अभ्यासासाठी पुस्तके व व्याख्याने सुचवणारा एक संदेश सगळीकडे पाठवत असतो. (तो खाली कॉमेंटमध्येही दिलेला आहे.)

पण, तरी एवढे सगळे वाचले तरी शिवचरित्राचा संक्षिप्त आढावा लिहायला हवा, असे वाटून एक लिखाण खाली देत आहे. शिवचरित्राची मुख्य सूत्रे लक्षात येणे यासाठी उपयोग होईल असे वाटते. 

शिवचरित्र - ठळक घटना

१) शहाजी महाराजांनी निजामशाही, आदिलशाही व मुघल अशा विविध ठिकाणी सरदारकी केली, तरी स्वत:ची सुमारे ५०००० फौज सांभाळून ठेवली होती. ही फौज त्यांच्याशी एकनिष्ठ होती. (१६२० ते १६४० या कालावधीत फौजेची उभारणी केली)

२) शहाजी महाराजांनी निजामशाही वाचवण्यासाठी भातवडीच्या युद्धात (१६२४) मुघल व आदिलशाही फौजांचा एकत्रित पराभव केला.

३) १६२९ मध्ये निजामशाहीतच शहाजी महाराजांच्या सासऱ्यांचा खून पाडला, त्यानंतर त्यांनी स्वतंत्र राज्य उभारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो आदिलशाही सरदार मुरार जगदेव याने हाणून पाडला. (१६३०-३१)

४) निजामशाही वाचवण्यासाठी अनेक लढाया देणे, मूर्तिजा निजामशहाला मांडीवर घेऊन त्याच्या नावाने राज्यकारभार करणे असे स्वराज्य उभारणीच वाटावी असे प्रयत्न शहाजी महाराजांनी केले. 

५) हे सगळे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर शहाजी महाराजांना १६३७ नंतर कर्नाटकातच पाठवले जाते. सुमारे ८-९ वर्षांमध्ये शहाजी महाराजांनी कर्नाटकचे राज्य स्थिर केले. ते म्हणायला आदिलशाहीचे सरदार असले तरी बहुतेक सर्व अंमल शहाजी महाराजांचाच होता. याच राज्याचा वारस म्हणजे व्यंकोजीराजे भोसले. पुढे शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांच्या या सगळ्या कामाचा पुष्कळच उपयोग झाला. 

६) शिवाजी महाराजांचा जन्म ज्युलियन कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३०, ग्रेगोरियन कालगणनेनुसार १ मार्च १६३०, हिंदू पंचांगानुसार फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी शिवनेरीवर झाला. 

७) शिवाजी महाराजांना चांगले कारभारी देऊन, दादोजी कोंडदेवांसारखा प्रशासक सोबत देऊन शहाजी महाराजांनी पुणे जहागिर दिली.

८) शिवाजी महाराजांनी जहागिर बळकट करायला सुरुवात केली. त्या वेळी त्यांचे मोठे भाऊ व वडील हे कर्नाटकात मोठा पराक्रम गाजवत होते. दोघांचाही पराभव करण्याकरता आदिलशाहीतून हल्ले झाले. बंगळूर शहर आणि पुरंदरचा किल्ला या दोघा भावांनी यशस्वीपणे लढवला व राखला. शहाजी महाराजांना मुरार जगदेव, अफझलखान व शहाजी महाराजांना शत्रू मानणाऱ्या सरदारांनी कारस्थान करून कैदेत टाकले होते. शिवाजी महाराजांनी शहाजहान बादशहाशी मैत्रीचे बोलणे करून मुघलांचा दाब आदिलशाहीवर आणून शहाजी महाराजांची सुटका आदिलशहाला करायला लावली. (१६४८)

९) पुढची सहा-सात वर्षे शिवाजी महाराजांनी फौजा जमवणे, किल्ले बळकट करणे यात घालवली. (१६४८ ते १६५६)

१०) १६५६ साली महाराजांनी जावळीचा प्रदेश रायरीच्या किल्ल्यासह ताब्यात घेतला. हे थेट अफझलखानाला आव्हान होतेच, पण जावळी कधीही परकी आक्रमकांच्या ताब्यात जाऊ शकली नव्हती. असे मोक्याचे ठिकाण ताब्यात घेतल्याने महाराजांना भक्कम आधार मिळाला. पुण्यामधील शहाजी महाराजांचा प्रयत्न अयशस्वी झाला होता, तसे आता शिवाजी महाराजांच्या बाबतीत होणे अवघड झाले - कारण माघार घ्यायला बळकट जागा उपलब्ध झाली. हे कामही महाराजांनी सुलतान महंमदशहा मरून अननुभवी अल्पवयीन वारस गादीवर आल्याच्या काळात केले. त्यावेळी आदिलशाहीही नाजूक होती. अफझलखानही कर्नाटकात तेव्हा गुंतलेला होता.

११) याच काळात १६५७ साली शहाजहान आजारी पडल्यामुळे त्याला कैदेत टाकून भावांचे खून पाडायला औरंगजेब उत्तरेत गेल्यामुळे महाराजांनी मुघलांच्या ताब्यातले काही किल्ले स्वत:कडे जिंकून घेतले. या वेळी आदिलशाहीचे नुकसान करायला स्वत: आदिलशाहीतले सरदार, शिवाजी महाराज महाराष्ट्रातून, मुघल उत्तरेतून व शहाजी महाराज दक्षिणेतून काम करतच होते.

१२) या लढायांचा शेवट म्हणजे अफझलखानाची दोन वर्षे (१६५६-५८) एवढी लांबलेली स्वारी अंतिमत: स्वराज्यावर झाली. महाराजांनी त्याला पुरंदरसारखेच राज्यात फार आत येऊ न देता स्वराज्याच्या तोंडावर असलेल्या प्रतापगडाजवळील डोंगराळ भागात गुंतवून त्याचे संपूर्ण लष्कर त्यासकट मारले. (नोव्हें १६५९) त्याची वार्ता पोचण्याच्या आतच महाराज त्याचा प्रदेश जिंकून आदिलशाहीवर चालून निघाले होते. पन्हाळा याच काळात जिंकला.

१३) मधल्या काळातील एक-दोन छोट्या लढाया सोडल्या तर आदिलशाहीने सावरून सिद्दी जौहरला महाराजांवर सोडले. त्याने पन्हाळ्याला वेढा घातला. चार महिन्यांनी जुलै १६६० मध्ये महाराज वेढ्यातून सुटले.

१४) तोवर औरंगजेबही खूनखराबा आटोपून संपूर्ण मुघल राज्य व्यवस्थित ताब्यात घेऊन बसला होता. शायिस्तेखानाचे स्वराज्याचे शोषण दोन वर्षे चालवले होते (१६६१-६२). शिवाजी महाराजांनी तोवर परत हळू हळू ताकद वाढवली होती. एक चाकणचा किल्ला जिंकायला खानाला अनेक महिने लागले. उंबरखिंडीच्या लढाईत खानाच्या दोन मोठ्या सरदारांना महाराजांनी शरण येण्यास भाग पाडले.

१५) काही काळ वाट पाहून धाडस करून महाराजांनी १६६३ साली शायिस्तेखानाला छापा घालून हुसकावून लावले. खान मरणारच होता, पण थोडक्यात वाचला.

१६) महाराजांची ताकद आता पुरेशी वाढली होती. त्यांनी स्वराज्यास बळकटी यावी, शत्रूचे नुकसान व्हावे म्हणून सूरत लुटली. बरेच धन घेऊन महाराज स्वराज्यात आले. 

१७) १६६३-६४ या काळात शहाजी व शिवाजी महाराजांची स्वतंत्रपणे गोळा झालेली ताकद एकत्र येण्याची शक्यता दिसू लागली. शिवाय पराक्रमाच्या वार्ता होत्याच. त्यामुळे औरंगजेबाने जयसिंहासारखा मोठा सरदार महाराजांवर पाठवायचे पक्के केले. सूरत शहर लुटले जाणे याचाही परिणाम झाला असावा. 

१८) सहज निसटून जाणारी घटना म्हणजे याच काळात म्हणजे १६५७ नंतरच नौदलाकडेही महाराजांचे लक्ष गेलेले होते. अफझलखानाची गलबते मक्केला जाण्याआधीच दम देऊन महाराजांनी ताब्यात घेतली होती. त्यामुळे जळदुर्ग व आरमार उभे करण्याचे काम महाराजांनी सुरू केले होते.

१९) या सर्व काळापर्यंत किंवा नंतरही युद्धे होत राहिली तरी महाराजांनी अतिशय सजगपणे न्याय केले, चोख व्यवस्था लावल्या. वतनदारांना अवाजवी कर गोळा करण्यापासून पद्धतशीर रोखले. महिलांवरचे अत्याचार थांबवले. ते सहन केले जाणार नाहीत अशी ताकीद दिली. शेतसारा एकदाच व्यवस्थित वसूल होईल अशी नेमकी रचना बसवली. सरसकट कर्जमाफी न करता - त्या त्या दुष्काळाच्या वेळी भांडवल म्हणून धान्य देणे व पुढील काळात ते अधिकच्या शेतसाऱ्यातून वळते करून घेणे अशा व्यवस्था लावल्या. न्यायदानाच्या चोख व्यवस्था बसवल्या. सर्वांना सहज न्याय मिळेल अशी व्यवस्था केली. म्हणून जनतेला हे राज्य आपले स्वत:चे वाटू लागले. 

२०) समर्थ रामदासांना या सर्व प्रयत्नाची अचूक जाणीव झाली होती. ते संपूर्ण भारत फिरलेले असल्याने मुसलमानी अत्याचार त्यांना पक्के ठाऊक होते. या अन्याय्य राजवटींविरोधात जनतेत जागृती निर्माण करण्याचे काम रामदास व त्यांच्या शिष्यांनी सतत चालवले होते. प्रत्यक्ष महाराजांची व रामदासांची भेट फार उशिरा झाली असली, तरी साधू संतांचे आशीर्वाद समाजात पसरत असल्यामुळेच स्वराज्यासाठी बलिदान देण्याची प्रेरणा अनेकांना मिळत होती.

२१) औरंगजेबाने राजपूत सेनापती मिर्झा राजा जयसिंग याला मोठ्या फौजेसह स्वराज्यावर पाठवले. त्याने स्वराज्यावर अत्यंत पद्धतशीर मोहिम चालवून अनेक किल्ल्यांना वेढे दिले. (१६६५) महाराजांनी आपला संपूर्ण नाश होईल, हे ओळखून लवकरच तह केला. वाट पाहात बसले नाहीत. त्यांना औरंगजेबाच्या दरबारात जावे लागले. 

२२) औरंगजेबाची तासभरच भेट झाली तरी त्यात झालेला अपमान महाराजांनी सहन करून घेतला नाही. नंतर गोडीगुलाबीची अनेक पत्रं पाठवली असतील, पण औरंगजेबाला महाराज शरण गेले नाहीत. चार महिने (मे ते ऑगस्ट १६६६) डावपेच चालू होते. महाराजांना लगेच मारले तर मराठ्यांवर फार मोठा विपरित परिणाम होईल व दक्षिणेतील युद्ध अंगावर येईल हे औरंगजेब जाणून होता. महाराज या बुद्धिबळात औरंगजेबाचा पूर्ण पराभव करून निसटले. औरंगजेबाचा सर्वात मोठा अपमान झाला होता.

२३) मात्र आग्र्यातून परत आल्यानंतर दोन–तीन वर्षे महाराजांनी पुन्हा स्वराज्याची ताकद वाढवण्यावर भर दिला. लगेच लढाई अंगावर घेतली नाही. किल्ले, फौजा व प्रशासन पुन्हा बळकट केले. (१६६६–१६६९)

२४) योग्य संधी साधून महाराजांनी मुघलांकडून गेलेले किल्ले पुन्हा परत मिळवण्याची मोहीम सुरू केली. काही वर्षांतच बहुतेक किल्ले परत स्वराज्यात आले. (१६७०)

२५) स्वराज्याची आर्थिक ताकद वाढवण्यासाठी महाराजांनी पुन्हा सुरतेवर स्वारी करून मोठे धन मिळवले. (१६७०)

२६) १६७०–१६७२ या काळात स्वराज्याने पुन्हा वेगाने विस्तार केला. मुघलांचे दख्खनमधील वर्चस्व मोठ्या प्रमाणात ढासळले.

२७) पूर्वीपेक्षा जास्त स्वराज्य ताब्यात आल्यावर महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. १६७४. यामुळे हिंदूंना लढायला एक कायमची मुख्य जागा निर्माण झाली. कलियुगात दोनच वर्ण - क्षत्रिय नसतातच अशी भ्रामक समजूत या निमित्ताने मोडली गेली. या निमित्ताने भाषेवर होणारी आक्रमणं राज्यव्यवहार कोशाची निर्मिती करून महाराजांनी परतवण्याची व्यवस्था केली. अष्टप्रधान मंडळ नेमके केले.

२८) राज्याभिषेक वैदिक मंत्रांनी होणे याने हिंदू धर्माचे पुन्हा महत्त्व वाढले. राज्याभिषेकानंतर मुसलमान बनवला गेलेल्या नेताजी पालकरांना महाराजांनी पुन्हा हिंदू करून घेतले. स्वभाषेसोबत स्वधर्माचा आग्रहही महाराजांनी दाखवला.

२९) सार्वभौम राज्य निर्माण झाल्यावर या राज्याच्या रक्षणासाठी strategic depth तयार करण्यासाठी म्हणून राज्याभिषेकानंतर महाराजांनी दक्षिणेकडे मोठी मोहीम काढून कर्नाटकातील अनेक किल्ले व प्रदेश ताब्यात घेतले. (१६७६–१६७८) या मोहिमेमुळे शहाजी महाराजांनी उभारलेल्या कर्नाटकातील मराठा सामर्थ्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. जिंजीसारखे अत्यंत मजबूत किल्ले स्वराज्याच्या ताब्यात आले. पुढे हे किल्ले मराठा साम्राज्यासाठी अत्यंत उपयोगी ठरले. मराठा छत्रपती या दक्षिणेतील सामर्थ्यामुळेच औरंगजेब स्वत: राज्यावर चालून आला तरी सुखरूप राहू शकला. 

३०) या मोहिमेत स्व-धर्माच्या आग्रहाची आणखी दोन उदाहरणे दिसतात - व्यंकोजीराजांना लिहिलेल्या पत्रात "तुमच्या सैन्यात दुष्ट तुरुकांचा समावेश असता जय कैसा होतो?" असा थेट प्रश्न विचारून हिंदू राज्याच्या रक्षणासाठी हिंदू सैन्य कसे उभारावे लागेल असे महाराज म्हणत आहेत. तसेच त्यांनी समेत्तिपेरुमल येथील मंदिर पाडून उभारलेली मशिद जाणीवपूर्वक पाडून पुन्हा मंदिर उभारले.

३१) औरंगजेबावर आक्रमण करायचे अथवा त्याचे येऊ घातलेले आक्रमण कसे रोखायचे या विचारात असतानाच महाराजांना १६८० साली अति थकव्यामुळे उद्भवलेल्या आजारांमुळे मृत्यू आला.

==================================================

वाचन साहित्य --

शिवजयंतीच्या निमित्ताने वैचारिक ठेवा
*पुस्तके*
१. बाबासाहेब पुरंदरेंचे राजा शिवछत्रपती.
२. बाबासाहेब पुरंदरेंचे "महाराज" हे इंग्रजी पुस्तक.
३.रणजित देसाई लिखित श्रीमान योगी
४. श्रीमान योगी या कादंबरीला लिहिलेली नरहर कुरुंदकर यांची ४१ पानी प्रस्तावना
५. शहाजी महाराजांच्या पार्श्वभूमीसाठी "राधामाधवविलासचंपू" ला राजवाड्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील पान क्र. ३९ ते ११५ .
*चित्रफिती*
१. शिवाजी महाराजांच्या इस्लामी राजवटींविरुद्धच्या हिंदू जागरणाच्या स्वराज्य-निर्मितीच्या प्रयत्नांचे स्वरूप समजावून सांगणारी चित्रफीत - https://youtu.be/5CDMcBZNNd4?si=OnJYdyQ2BRn45dhJ
२. वरच्या विषयावर दीर्घ मांडणी ऐकण्यासाठी गजाननराव मेहेंदळेंचेच पुढील व्याख्यान -https://youtu.be/Sbcatrf3faw?si=eFdIfhnsQqa2wzSm
३. कुरुंदकरांचे इस्लामी प्रवाहाविरुद्ध शिवराय कसे उभे राहिले आणि जातीय राजकारणात समर्थ रामदासस्वामी यांचे योगदान ठळक करणारी व्याख्यानमाला -
व्याख्यान १: https://youtu.be/nfZMTsytTxg?si=qXLGOvOjIO8Xy7XG
व्याख्यान २: https://youtu.be/UisSnM6LI6Q?si=1iOZ7gHTOZcM63sI
व्याख्यान ३: https://youtu.be/IELOy_Oiodc?si=miog8rGv1U-zeKr-
४. समाजवादी मंडळी इतिहासाचे विकृतीकरण का आणि कसे करतात याबद्दलची मांडणी -
५. याशिवाय निनाद बेडेकरांची सर्व व्याख्याने:
व्याख्यान १- https://youtu.be/BriQiOgGgvk?si=ZJM-26detrDtLcKm
व्याख्यान २-https://youtu.be/_jEj6YYAOJQ?si=f9npEKAxEg2u6zCD
व्याख्यान ३-https://youtu.be/jdYX-seIGfk?si=crK7C4bQkWcTynv4
व्याख्यान ४-https://youtu.be/xf3owhswSdE?si=9yLX-jtm-KQUiDNB
व्याख्यान ५-https://youtu.be/WrfW8mVVApk?si=ltSUGgpje0TRoKvO
व्याख्यान ६-https://youtu.be/fEw98QbjO9A?si=LcU3hp_bklPL5QdB
व्याख्यान ७-https://youtu.be/eGh0asIbo-s?si=03eV-ID9e7HQl_q0
व्याख्यान ८-https://youtu.be/i-OMPxL31wg?si=i7PbJafH3-EoIICm
व्याख्यान ९-https://youtu.be/vmLAaII_UI0?si=QqDPNlBS1vkl3JmI
*सखोल वाचन*
६. मराठा रियासत खंड १ ते ८.
७. विजयराव देशमुखांचे "शककर्ते शिवराय".
८. इंग्रजी पुस्तक - "Shivaji: His Life and Times".
९. रामचंद्रपंत अमात्यकृत *आज्ञापत्रे*, कवींद्र परमानंदांचे *शिवभारत*.
१०. गजाननराव मेहेंदळ्यांचेच "श्री राजाशिवछत्रपती" याचे भाग १ व २.
(ज्यांनी शिवव्याख्यात्यांची अन्य काही व्याख्याने/पुस्तके वाचली / ऐकली असतील, त्यांनी वरील अभ्यासात जरूर भर घालावी.)


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गीता समजून घेताना - १

 गीता समजून घेताना - १ कालच्या गीताजयंतीच्या निमित्ताने आज लिहित आहे. गेले काही महिने काही जण गीतेचा अभ्यास करत आहोत. या अभ्यासाची सुरुवात गीतेच्या श्लोकांच्या विभागणीतून झाली. गीतेची १८ अध्यायांमध्ये विभागणी ही मूळ व्यासांनी केलेली विभागणी आहे असे मानू. ज्ञानेश्वर महाराज, शंकराचार्य यांनी प्रत्येक श्लोकावर भाष्य लिहिली. ती पद्धतच आहे. एकेक श्लोक घ्यायचा, त्यावर निरूपण लिहायचे. लोकमान्य टिळकांनीही गीतारहस्यात ही परंपरा सोडलेली नाही. त्यांनीही गीतेचा अर्थ लिहिता लिहिता आपले भाष्य त्यावर गद्य रूपात नोंदवले आणि त्या शिवाय १४-१५ प्रकरणांमध्ये तौलनिक तत्त्वज्ञान, प्रासंगिकता, नीतीशास्त्र अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे निबंधात्मक चिंतन मांडले. दोन्ही मिळून गीतारहस्य ग्रंथ तयार झाला.  १) क्रमाने विनोबांनी रसाळ भाषेत गीताप्रवचने लिहिली. त्यात श्लोकांच्या आधारे मांडणी नाही. संपूर्ण अध्यायावर एक छोटे प्रवचन असे स्वरूप देऊन त्या त्या अध्यायातील महत्त्वाच्या संकल्पनांचे सुबोध विवेचन असे गीताप्रवचनाचे स्वरूप राहिले. हे करताना विनोबांनी प्रत्येक अध्यायाचेही विषयांनुसार तुकडे पाडले. त्यांना अध...

कॅथॉलिक चर्च या संघटनेचा अभ्यास

कल्पेशदादाने ज्ञान प्रबोधिनी, पुणे व्हॉट्सॅप गटावर पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली. माझी पण त्यांना श्रद्धांजली. जागतिक बंधुता आणि पर्यावरण या विषयांवर कट्टर, सनातनी वाटणाऱ्या चर्चचे प्रमुख म्हणून चांगले लेखन व कृती करणारे धार्मिक नेते म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. पोप फ्रान्सिस यांनी अनेक नवे बदल चर्चमध्ये घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आधीचे पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी प्रकृतीअस्वास्थ्यास्तव राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू होईपर्यंत एक वर्तमान पोप म्हणून फ्रान्सिस आणि पोप इमेरिटस बेनेडिक्ट हे दोघेही एकाच वेळी जिवंत होते.  या दोघांच्या संबंधावर एक छान चित्रपट आलेला होता. नेटफ्लिक्सवर आहे.जरूर पाहावा. या लेखाशी थोडाफार संबंधितही आहे. या चित्रपटाविषयी अजून जाणून घेण्यासाठी -  विकिपीडिया लिंक  .  आपण २००० वर्षं टिकेल अशी संघटना करायचं जेव्हा म्हणतो तेव्हा उदाहरण म्हणून चर्चचे उदाहरण समोर ठेवावेच लागेल. पोप फ्रान्सिस हे २६६ वे पोप आहेत. युरोप ग्रामावस्थेत असल्यापासून मध्ययुगपूर्व युरोपीय व्यवस्था, मध्ययुग, मध्ययुगात राज्यव्यवस्था आपल्या हातात ठेवणे, तिचा...

... यांची तेजस्वी परंपरा म्हणजे मी! - पूरक मुद्दे

 वरील शीर्षक असणाराच लेख पूर्वी पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांनी "भारताचा राष्ट्रवाद" या संग्रहात मांडलेला आहे. मनुष्याला सुटे अस्तित्व नसून, तो अनेक परंपरांचा परिणाम असतो. असे या लेखात अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शविले आहे. मला अनेक परंपरांचा परिणाम म्हटला की मॅट्रिक्स सिनेमा आठवतो. त्यात, मॅट्रिक्सचा आरेखक (the Architect) कथानायकाला असे सांगतो की तुझे त्याच्याकडे - आरेखकाकडे जाणे - हे अनेक घटनांच्या बेरजेचा परिणाम आहे. अशा परंपरांकडे तुच्छतेने वा द्वेषाने बघण्याची दृष्टी मार्क्स वा त्याच्या सारख्या जगभराच्या अर्धवट विचारवंतांकडेच, किंवा छद्म-उदारमतवादी लोकांकडे असू शकते. परंपरांनी "नाही रे" वर्गाचे शोषण करणे शक्य होते, हे वादापुरते मानू. परंपरा सतत सुधारत्या राहिल्या आहेत, व परंपरांची बेरीजच अस्तित्वाचे सातत्य टिकवून धरते, हे मार्क्सिस्टांना  अथवा त्यांच्या भारतातील ०.००५% संपृक्त भ्रष्ट नकलांना कधी कळलेच नाही असे मला स्पष्टपणे वाटते.  पुगंच्या लेखात परंपरा, त्यांचे औचित्य, कालानुरूप बदल करणे इ. अनेक मुद्द्यांचा सविस्तर ऊहापोह केलेला आहे. त्यासाठी हा लेख नाहीच. पु...