आपला राष्ट्रवाद हा मानव्याच्या हितासाठी आहे, हे प्रत्येक राष्ट्राला दाखवून द्यावे लागेल. असे काही निकष असतील की ज्यांच्या आधारे प्रत्येक राष्ट्राने मानव्याच्या हितासाठी काम केले आहे की नाही याचे मूल्यमापन करता येईल. असे मूल्यमापन करण्याच्या निकषांपैकी प्रत्येक निकषांचे राष्ट्रागणिक महत्त्व बदलेल. प्रत्येक राष्ट्राचा निकषसंच वेगळा तयार होईल. जे आपले निकष इतरांना पटवून देऊ शकतील, त्यांना अधिक महत्त्व येईल. अशा निकषांवर उतरलेली जी राष्ट्रे मानव्याच्या हितासाठी काम करत आहेत, त्या राष्ट्रांची घडण व प्रगती झाली तरच मानव्याची प्रगती होईल हे उघड आहे. मानव्याचा इतिहास १५००० वर्षांच्या पलीकडे जात नाही. जागतिक रचना कशाबशा लागलेल्या आहेत आणि जग बहुध्रुवीय झालेले आहे अशी आजची स्थिती आहे. ती स्थिती थोडीफार बदलेल, काही राष्ट्रांना स्वत:मध्ये प्रचंड बदल करावे लागतील. काही संस्कृतीही स्वत:ला बदलून घेतील. हे झाले की अशा नवीन व्यवस्थेचे आयुष्य वाढते कसे ठेवायचे हा प्रश्न असेल. सध्याचे तिचे आयुष्य फार तर शंभरेक वर्षांचे आहे. किमान हजार वर्षांचे भवितव्य समोर मांडल्याशिवाय चांगली प्रेरणादायक उद्द...