गीता समजून घेताना - १ कालच्या गीताजयंतीच्या निमित्ताने आज लिहित आहे. गेले काही महिने काही जण गीतेचा अभ्यास करत आहोत. या अभ्यासाची सुरुवात गीतेच्या श्लोकांच्या विभागणीतून झाली. गीतेची १८ अध्यायांमध्ये विभागणी ही मूळ व्यासांनी केलेली विभागणी आहे असे मानू. ज्ञानेश्वर महाराज, शंकराचार्य यांनी प्रत्येक श्लोकावर भाष्य लिहिली. ती पद्धतच आहे. एकेक श्लोक घ्यायचा, त्यावर निरूपण लिहायचे. लोकमान्य टिळकांनीही गीतारहस्यात ही परंपरा सोडलेली नाही. त्यांनीही गीतेचा अर्थ लिहिता लिहिता आपले भाष्य त्यावर गद्य रूपात नोंदवले आणि त्या शिवाय १४-१५ प्रकरणांमध्ये तौलनिक तत्त्वज्ञान, प्रासंगिकता, नीतीशास्त्र अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे निबंधात्मक चिंतन मांडले. दोन्ही मिळून गीतारहस्य ग्रंथ तयार झाला. १) क्रमाने विनोबांनी रसाळ भाषेत गीताप्रवचने लिहिली. त्यात श्लोकांच्या आधारे मांडणी नाही. संपूर्ण अध्यायावर एक छोटे प्रवचन असे स्वरूप देऊन त्या त्या अध्यायातील महत्त्वाच्या संकल्पनांचे सुबोध विवेचन असे गीताप्रवचनाचे स्वरूप राहिले. हे करताना विनोबांनी प्रत्येक अध्यायाचेही विषयांनुसार तुकडे पाडले. त्यांना अध...