SPOILER ALERT
कथानकातील काही घटनांचा थेट उल्लेख आहे, त्यामुळे आधी चित्रपट पाहून मग इथे आलेले चांगले.
धुरंधर -२ पाहिला.
अनेकांनी त्याच्या विविध पैलूंवरती पुष्कळ लिहिले आहे. बरे-वाईट दोन्ही लिहिले आहे. "पीक-डिटेलिंग" वर व्यंगचित्रेही बनवून झाली. सहसा वाचनात न आलेलं एक उदाहरण देऊन मुख्य मुद्द्याकडे जाऊ - एका अतिरेक्याला मारायला एक परिचारिका (नर्स) येते, तिची भूमिका यामी गौतम यांनी म्हणजे आदित्य धर यांच्या पत्नीने केलेली आहे. त्या परिचारिकेचे नाव शझिया बानो ठेवलेले आहे. तिच्या कपड्यांवरील नामपट्टीकडे सहज लक्ष जात नाही म्हणून ते लक्षात येत नाही. शझिया बानो हेच यामी गौतम यांच्या नुकत्याच आलेल्या "हक" या नितांत सुंदर चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेचे नाव आहे.
हा तपशील मांडण्याचे कारण धुरंधरच्या तत्त्वज्ञानाशी जोडलेले आहे असे वाटते. कसे ते हळू हळू पाहात जाऊ.
धुरंधर -१ हे मुख्यत: वातावरण निर्मितीसाठीची तयारीच आहे. पाकिस्तानातील विविध गट, त्यांच्यातील लढाया, त्यांच्यातील ईर्ष्या / स्पर्धा, बलुच स्वातंत्र्यलढा याबद्दल पुरेशी पार्श्वभूमी तयार केली नसती तर भाग-२ मधील घटनांचा अन्वयच लागला नसता.
१९९९ - २०१२ या कालावधीत मॅट्रिक्स आणि डार्क-नाईट या दोन चित्रपट-त्रिकुटांमध्ये अत्यंत गुंतागुंतीचे कथानक मांडलेले होते. मॅट्रिक्सच्या तिन्ही भागांमध्ये मिळून कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रोग्रॅम्स आणि माणसे यांच्यातील परस्परसंबंधांवर भाष्य आहे. ते भाष्य पचावे, थोडी मेंदूला मोकळीक मिळावी म्हणून हाणामारीची दृश्ये ही अधूनमधून घातली आहेत. ती नसती तर मग चित्रपट चालले नसते. डार्क नाईट (२००८) या चित्रपटात तर मुख्यत: जोकर आणि बॅटमॅन यांच्यातील तात्त्विक चर्चाच केंद्रस्थानी आहे. मनुष्य मुळात वाईट असतो की चांगला, समूहामधील वर्तन कसे बिघडवता येते, एखाद्या माणसाला आदर्शवादामध्ये फसवून त्याचे भावनिक आघातांद्वारे पतन घडवता येते का या प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा आहे. ही चर्चा समजावी म्हणून सिनेमा काढला आहे.
धुरंधर - १ तसा नाही. त्यात अजून तात्त्विक चर्चा आलेली नाही. ती यायची आहे. ती येते भाग-२ मध्ये. इस्लामी दहशतवादाचेही एक तत्त्वज्ञान आहे. तुम्हाला पटणारे नसले तरी त्याच्यासाठी कुर्बानी देणारे शेकडो दहशतवादी तयार होणार आहेत. ते दहशतवादी तयार करण्याचे निश्चित कार्यक्रम आहेत. अशा आक्रमक तत्त्वज्ञानाला उत्तर काय असते?
बलिदान परमो धर्म!
ही धुरंधर चित्रपटद्वयाची कळ आहे. त्यागेनैव अमृतत्वमानशु: (कैवल्योपनिषद) ही उपनिषदांची घोषणा आहे. कुर्बानीच्या तत्त्वज्ञानाला बलिदानाने उत्तर हे सतत मांडत राहायला हवे. ते आदर्श नवीन पिढीच्या भाषेत मांडायला हवेत. पुन्हा पुन्हा सांगावे लागते - विवरलेचि विवरावे असे समर्थांनी म्हणून ठेवले आहे तेच इथे मांडलेले आहे.
हे करताना काय होईल? आपण फसू - अपयशी ठरू - तरी पुन्हा भांडत राहायचंय ! मर्द है इसीलिए लढना पडेगा असं करावं लागेल - संग्राम जिंदगी हे लढना उसे पडेगा, जो लढ नही सकेगा आगे नही बढेगा!! अशा वेळी "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भु: मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥" हे लक्षात ठेवावे लागते. फळ कसे मिळेल याचा विचार सोडून उद्दिष्टासाठी प्रयत्नरत राहा इथून धुरंधर-२ ची सुरुवात होते आणि बलिदान परमो धर्म इथे शेवट होतो.
या सुरुवात-शेवटच्या मंत्रांच्या मध्ये कालसुसंगत युगधर्माची मांडणी येते. जयशंकरांचं "इंडिया वे" हे जे पुस्तक आहे, त्या मध्ये अवधचे नवाब एकमेकांशी बुद्धिबळं खेळत बसले आणि ब्रिटिश आमच्या छातीवर येऊन बसत गेले या आत्ममग्नतेवर कठोर टीका आहे. “…This default option of playing defence reflects a mindset that does not comprehend external events well, leave alone appreciate their implications”, आणि, “Conducting international relations, while being agnostic about the character of the societies, has its limitations”. हा विद्यमान परराष्ट्रमंत्र्यांचा सांगावा आहे. तोच सांगावा "ये नया भारत है । ये घरमें घुसकर मारेगा" या घोषणेत परिणत होतो.
आम्ही आमच्यात मग्न राहिलो, फक्त बचावात्मक राहिलो, तर शत्रू आत येत राहणारच. आण्विक हल्ल्याची भीती सोडून देऊन क्रमश: आत येऊन येऊन थेट दहशतवादी मारणे, तुम्ही अतिरेकी पाठवलेत तर अतिरेकी जिथून येतात तिथे थेट जाळपोळ करणे, तुम्ही निष्पाप नागरिकांना मारलेत तर "अज्ञात" मनुष्यांनी मुळावर घाव घालणे ही सरकारच्या कार्यक्षेत्रातील आक्रमकता आहे.
तुम्ही जिहादचे तत्त्वज्ञान मांडायला लागलात, कुर्बानीचे तत्त्वज्ञान मांडायला लागलात तर त्याला बलिदानाने उत्तर आणि देशभक्तीने उत्तर तितक्याच जोरकसपणे मांडणे गरजेचे आहे. कोणी याला "प्रोपोगांडा" म्हणेल. याची पर्वा न करता थेट उत्तर देणे ही ती धुरंधर-२ ची वैचारिक पार्श्वभूमी आहे. मेजर इक्बाल आणि हमजा यांची शेवटची मारामारी चालू असताना जिहादचे तत्त्वज्ञान व कार्यक्रम स्पष्टपणे मांडलेला आहे. "हम आपके सभी मर्दोंका खतना करेंगे ! माल-ए-गनीमत (म्हणजे उजव्या हाताने पकडलेल्या शत्रूंच्या स्त्रिया) यांचा आम्ही उपभोग घेऊ ! नई दिल्ली को नया इस्लामाबाद बनाएंगे" या सगळ्या इक्बालच्या घोषणा आहेत. त्या इतक्या स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. मेजर इक्बाल घाबरणारा नाही. मृत्यूच्या तोंडात असतानाही तो माझ्यासारखे शेकडो लोक येतील, आम्ही जिंकणारच असे विजिगीषू वृत्तीने बोलत राहतो. हमझा तेव्हा एकदाच त्याला नया भारत म्हणजे काय आहे ते ऐकवतो, आणि आपले काम संपले म्हणून भारतात परत येतो. तेव्हा जमील जमाली आणि अजय संन्याल म्हणतात एक जंग जिती है, आगे भी जितेंगे! इक्बालच्या वृत्तीचा अर्थ या दोघांना पक्का कळलेला आहे हे आपल्याला दिसते.
पण मग घुसकर मारेंगेचे तत्त्वज्ञान जिहादी तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे कसे? हमजा आणि यालिना यांच्या संवादात याचे उत्तर सापडते. आपण सर्व दहशतवाद्यांना का मारत आहोत हे तिला सांगताना हमजा म्हणतो "हमारी लढाई आपसे नहीं है! इन जिहादीयोंसे लढना है"! पुलवामानंतरचे दहशतवादी तळांवरचे हल्ले म्हणून जगाने सहज स्वीकारले. जयशंकरांचेच शब्द थोड्याफार फरकाने वापरायचे तर "we follow a rule-based order". ही ती मांडणी आहे. १९५४ साली ऍनिमल फार्म आला होता. सीआयए नेच काढला होता. पण कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाला वेगळ्या प्रतिमासृष्टीतून विरोध व्यक्त केला होता. अनेक ठिकाणी मग अशा चित्रपटांमधील वाक्यं वापरली जातात. "All are equal, but some are more equal..." वगैरे! ये नया हिंदुस्तान है या वाक्याचेही भारतापुरते असेच झाले आहे.
सुरुवातीला यामी गौतमच्या हक चित्रपटाचा उल्लेख केला. ते विरुद्ध आपण अशी मांडणी न करता, मुस्लिम समाजातील घुसळण मांडणे, हिंदू बाजूंचा फारसा उल्लेखही न आणणे हे हक चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. वाद कुठे करायचे, कुठे टाळायचे यात विचारपूर्वक घेतलेले निर्णय त्या चित्रपटामध्येही दिसून येतात.
समोरच्या बाजूच्या सर्व सत्य घटना घ्यायच्या, जिहादचे तत्त्वज्ञान मांडायचे, आपण दिलेली प्रासंगिक उत्तरंही एका सूत्रात आहेत असं मांडायचं, आपलं तत्त्वज्ञानही समोर ठेवायचं आणि प्रेक्षकाला सदसद्विवेकबुद्धी वापरायला भाग पाडायचं असा अभिनव प्रयोग आदित्य धरने करून दाखवलेला आहे.
"आम्ही राफेल पाडली", "अभिनंदनला दया दाखवून सोडलं", "पीएम इज कॉम्प्रोमाईज्ड" वगैरे भ्रामक समजुतींचा मोठा दुष्प्रचार सीमेच्या दोन्ही बाजूंनी झाला. मग कल्पितच बोलायचे असेल तर आम्ही इतकं अफाट कल्पित मांडू की तुम्हाला तुमच्या सर्वच रचनांबद्दल प्रश्न पडावेत. दाऊद, आयएसआय, दहशतवादी वाटायला फार मोठं आव्हान वाटलं तरी त्यांना खेळणं करून दाखवणं, तुमचा डायरेक्टर जनरलच बुजगावणे आहे, अज्ञात कुठेही येऊन कोणालाही मारू शकतात, अशी कल्पितं का नकोत?
पुण्यातल्या सनातन्यांनी "आज पेशवाई असती तर सुधारकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते" अशी गर्जना केली होती. त्यावर सावरकरांनी उत्तर म्हणून "आज पेशवाई असती" तर काय काय अभिमानास्पद केले असते असा एक छान लेख लिहिला. कल्पितच मांडायचे तर धुरंधरसारखे मांडा, गंगा-जमनी तहजीब सारखे का मांडता असा यशस्वी प्रश्न धुरंधरने सर्वांसमोर ठेवला आहे.
जुनी गाणी, नवीन गाणी, नवीन चेहरे, जुने चेहरे, वास्तव, कल्पित, असं काही हातात द्या, त्याचं सोनं करून दाखवू असा आदर्श आदित्य धर ने दाखवला याबद्दल त्याचे अभिनंदन!
बलिदान आणि कुर्बाणी मधे फरक काय आहे?
ReplyDelete